प्रो कबड्डी: हा आहे कबड्डीप्रेमींची मने जिंकणारा क्षण !

प्रो कबड्डीमध्ये आज यु.पी.योद्धा आणि हरयाणा स्टीलर्स या संघात सामना होणार आहे. हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्याच्या अगोदर आज सरावाच्या ठिकाणी जे दृश्य पाहायला मिळाले त्याने कबड्डीप्रेमींची मने जिंकली.

या मोसमात डिफेन्समध्ये सर्वोत्तम लयीत असणारा हरयाणाचा कर्णधार सुरिंदर नाडा आणि यु.पी. योद्धाच्या डिफेन्समधील मुख्य खेळाडू जीवा कुमार यांना एकमेकात चर्चा करताना पाहायला मिळाले. सुरिंदर नाडाच्या हालचालीवरून हे स्पष्ट होत होते की, तो जीवा कुमारला डिफेन्समधील महत्वाचे कौश्यल्य अँकल होल्ड आणि पुश या गोष्टी समजावून सांगत होता.

सध्या यु.पी. संघासाठी डिफेन्स चिंतेची बाब ठरत आहे. मागील सामन्यात यु मुंबा विरुद्ध यु.पी.चा डिफेन्स चांगली कामगिरी करू शकला नव्हता. याचा संघाला फटका बसून हा सामना यु.पी.ला गमवावा लागला. या उलट हरियाणा स्टीलर्सचा डिफेन्स या स्पर्धेतील सर्वोत्तम डिफेंसिव्ह खेळ करत आहे.

सुरिंदर नाडा आणि जीवा कुमार हे पहिल्या तीन मोसमात यु मुंबाच्या डिफेन्समधील मुख्य खेळाडू होते. चौथ्या मोसमात सुरिंदर नाडा हा बेंगलूरु बुल्ससाठी करारबद्ध झाला. पहिल्या तीन मोसमात सोबत असल्याने या दोन खेळाडूंमध्ये चांगली मैत्री आहे. यु मुंबाचा खेळताना डिफेन्समधील चर्चा करताना या दोघांना अनेकदा पाहायला मिळायचे.

आज ते विरोधी असले तरी आपल्या जवळील ज्ञानाचे देवाण-घेवाण करण्यास हे कबड्डीपटू कमीपणा समजत नाहीत. कबड्डीचा खेळ मोठा होण्यात अशा मैत्रीपूर्ण गोष्टी पोषक ठरल्या आहेत. अशा निकोप स्पर्धेमुळे कबड्डीची प्रतिमा दिवसेंदिवस वाढत आहे.