हरयाणा स्टीलर्सचा कर्णधार सुरिंदर नाडा झाला विक्रमवीर!!!

प्रो कबड्डीमध्ये परवा झालेल्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सने दिल्ली मुक्कामात दबंग दिल्ली संघाला ४२-२४ असे पराभूत केले. दिल्ली संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग तिसरा पराभव होता. या सामन्यात हरयाणा संघाकडून खेळाच्या सर्व पातळयावर खूप उत्तम कामगिरी झाली. रेडींगमध्ये या संघाने १५ गुण मिळवले तर डिफेन्समध्ये १८ गुण मिळवले. या सामन्यात हरयाणा संघासाठी सर्वाधीक गुण मिळवणारा खेळाडू राकेश सिंग कुमार हा देखील डिफेंडर होता. त्याने डिफेन्समध्ये ७ गुण कमावले.

या सामन्यात हरयाणा संघाचा कर्णधार सुरिंदर नाडा याने देखील डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी करत हाय फाईव्ह कमावला. या सामन्यात डिफेन्समध्ये पाच गुण मिळवण्याची कामगिरी करत त्याने प्रो कबड्डीच्या एका मोसमात सर्वाधीक ७ हाय फाईव्ह मिळवण्याचा विक्रम केला. त्याने मागील सामन्यात देखील हाय फाईव्ह मिळवला होता.

या मोसमाच्या अगोदर एका मोसमात सर्वाधीक ६ हाय फाईव्ह मिळवण्याचा विक्रम संदीप कंडोला आणि मोहीत चिल्लर संयुक्तरीत्या या दोन खेळाडूंच्या नावावर होता. संदीपने दुसऱ्या मोसमात १६ सामने खेळताना ६ हाय फाईव्ह मिळवले होते तर मोहितने तिसऱ्या मोसमात १३ सामने खेळताना ६ हाय फाईव्ह मिळवले होते.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर –

# पाचव्या मोसमाच्या हरयाणा स्टीलर्सच्या पहिल्या पाच सामन्यात सुरिंदर नाडा याने सलग ५ हाय फाईव्ह कमावले होते.

#हरयाणा स्टीलर्सच्या पाचवा सामना प्रो कबड्डीच्या या मोसमातील ३७ वा सामना होता. या सामन्यात सुरिंदर नाडाने हाय फाईव्ह कमावला. परंतु सहावा हाय फाईव्ह कमावण्यासाठी सुरिंदरला पाचव्या मोसमातील ८७व्या सामन्याची प्रतीक्षा करावी लागली. जयपूर विरुद्धच्या सामन्यात सुरिंदरने सहावा हाय फाईव्ह मिळवला.

# २४ सप्टेंबर रोजी झालेल्या या मोसमाच्या ९३ व्या सामन्यात सुरिंदरने ७वा हाय फाईव्ह मिळवत नवीन विक्रम रचला.

# प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात १५ सामने खेळताना सुरिंदर नाडा याने सर्वाधीक ५ हाय फाईव्ह मिळवले होते.

# प्रो कबड्डीच्या दुसऱ्या मोसमात १६ सामने खेळताना संदीप कंडोला याने सर्वाधिक ६ हाय फाईव्ह मिळवले होते.

# प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमात सर्वाधीक हाय फाईव्ह मिळवण्याची कामगिरी मोहित चिल्लर याने केली होती. त्याने १२ सामने खेळताना ६ हाय फाईव्ह मिळवले होते.

# प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमात सर्वाधीक हाय फाईव्ह मंजीत चिल्लर याने मिळवले होते.अशी कामगिरी करण्यासाठी त्याने १२ सामने खेळले होते.

# पाचव्या मोसमात सुरिंदर नाडा याने सर्वाधीक ७ हाय फाईव्ह मिळवले आहेत. त्याच बरोबर चालू मोसमात बेंगाल वॉरियर्सचा कर्णधार सुरजीत सिंग याच्या नावावर देखील ६ हाय फाईव्ह आहेत. त्याने सहा हाय फाईव्ह मिळवण्याची १८ सामने खेळले आहेत.