ट्वेंटी२० मध्ये ७ हजार धावा करणारा रैना बनला केवळ दुसरा भारतीय

कोलकता । आज भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय बनला आहे.

आज इडन गार्डन, कोलकाता येथे सईद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने उत्तर प्रदेश संघाकडून खेळताना बंगाल संघाविरुद्ध ३८ चेंडूत ८२ धावा केल्या असून सामन्याचे अजूनही ८ षटके बाकी आहेत.

या खेळीत त्याने आतापर्यंत ९ चौकार आणि ५ षटकार खेचले आहेत. याबरोबर भारतात ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये २०० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये आता रैनाचा समावेश झाला आहे.

भारतात ट्वेंटी२० मध्ये ख्रिस गेलने २८८ तर रोहित शर्माने २०९ षटकार खेचले आहेत. रैनाने आजपर्यंत २०१ षटकार हे भारतात खेचले आहेत.

रैनाने २६५ ट्वेंटी२० सामन्यात ३२पेक्षा जास्तचा सरासरीने ७००० धावा केल्या आहेत तर विराट कोहलीने २२६ सामन्यात ४०.८५च्या सरासरीने ७०६८ धावा केल्या आहेत.

७ हजार धावा करणारा रैना हा जगातील केवळ ९ वा खेळाडू आहे.