सुरेश रैना झाला यो यो टेस्टमध्ये पास

मात्र भारताकडून खेळण्याची संधी मिळणार का ?

नॅशनल क्रिकेट अकॅडमी बेंगलोर येथे झालेल्या यो यो फिटनेस टेस्टमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना पास झाला आहे.

पुढच्या महिन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. त्याआधी सुरेश रैनाने ही टेस्ट यशस्वी पार केली आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच संघ निवड झाली आहे.

परंतु मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अजूनही संघ निवड झालेली नाही. त्यामुळे सुरेश रैनाने ही टेस्ट पूर्ण केल्याने मर्यादित षटकांच्या मालिकेच्या संघ निवडीसाठी तो उपलब्ध असेल.

“नॅशनल क्रिकेट अकॅडमी बेंगळूर येथे मी ही टेस्ट पास होण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच प्रशिक्षक, सराव घेणारे आणि अधिकारी यांनी मला खूप पाठिंबा दिला. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. एनसीएमधील प्रशिक्षण माझ्यामध्ये उत्साह वाढवते. तसेच माझ्या क्षमतेला मी पूर्णपणे वाव द्यावा यासाठी ते मला प्रेरणा देतात.” असे सुरेश रैनाने ट्विट करून सर्वांचे आभार मानले आहेत.

सध्या भारतीय क्रिकेट संघात प्रवेश मिळविण्यासाठी सर्वच खेळाडूंना ही टेस्ट पूर्ण करणे आवश्यक आहे. टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच खेळाडूंची संघामध्ये निवड केली जाते. यासाठी खेळाडूंना किमान १६.१ इतके गुण मिळविणे आवश्यक आहे.

तर भारताचा खेळाडू युवराज सिंग या टेस्टमध्ये सतत अयशस्वी होत होता. परंतु या यावेळेस त्याने १६.३ इतके गुण मिळवून ही टेस्ट यशस्वीपने पूर्ण केली आहे.

सध्या सुरु असलेल्या रणजी मालिकेत रैनाने उत्तर प्रदेशकडून पाच सामने खेळले आहेत. तसेच त्याने भारताकडून टी२० सामना फेब्रुवारी महिन्यात झालेल्या इंग्लंड विरुद्ध मालिकेत खेळला होता. तर तो दक्षिण आफ्रिकेबरोबर वनडे सामना २०१५ या साली खेळला होता.