सुरेश रैनाला आयपीएलमध्ये गेल्या १० वर्षात जे जमले ते यावर्षीही जमणार का

मागील १० वर्ष आयपीएलने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच आयपीएलच्या यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स या संघांची गणना होते. यातील चेन्नई संघाचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने आजपर्यंत आयपीएलमध्ये नेहेमीच चांगला खेळ केला आहे.

रैना आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तसेच सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडूही आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत एकही मोसमात रैनाने ३७० पेक्षा कमी धावा केलेल्या नाही.

यात रैनाने तब्बल ५ वेळा ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर तीन वेळा ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याने दोन वेळाच ४०० पेक्षा कमी धावा केल्या आहेत.

रैनाने आजपर्यंत १६१ सामने खेळताना ३४.१३ च्या सरासरीने ४५४० धावा केल्या आहेत. यात १ शतक तर ३१ अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने यात २५ विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे रैना उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या मोसमातही अशीच कामगिरी कायम ठेवतो का याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.

रैनाला चेन्नई सुपर किंग्सने २००८ मध्ये संघात सामील करून घेतले होते. तेव्हापासून रैना २०१५ पर्यंत चेन्नई संघाकडूनच खेळला. मात्र त्यानंतर २०१६ आणि २०१७ असे दोन वर्ष चेन्नई संघावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आली. त्यामुळे हे दोन वर्ष रैना गुजरात संघाकडून खेळला. तसेच त्याने या संघाचे कर्णधारपदही सांभाळले.

यावर्षी चेन्नईने आयपीएलमध्ये पुनरागमन करताना रैनाला लिलावाआधीच संघात कायम केले. त्याच्याबरोबरच चेन्नईने कर्णधार एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंनाही संघात कायम केले.

रैनाने यावर्षी एकवर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा भारतीय संघातही स्थान मिळवले आहे.

आयपीएलच्या १० मोसमातील रैनाची कामगिरी:

४२१ धावा आणि १ विकेट – २००८
४३४ धावा आणि ७ विकेट्स – २००९
५२० धावा आणि ६ विकेट्स- २०१०
४३८ धावा आणि ४ विकेट्स- २०११
४४१ धावा आणि २ विकेट्स- २०१२
५४८ धावा आणि १ विकेट- २०१३
५२३ धावा आणि १ विकेट- २०१४
३७४ धावा आणि २ विकेट्स- २०१५
३९९ धावा आणि विकेट्स नाही – २०१६
४४२ धावा आणि १ विकेट- २०१७
२०१८-?