सुरेश रैनाचा ट्वेंटी२०मध्ये धमाका, निवड समितीला दिला इशारा

कोलकाता । बंगाल विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात सईद मुश्ताक अली स्पर्धेत आज उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार सुरेश रैनाने बंगालविरुद्ध ५९ चेंडूत नाबाद १२६ धावांची खेळी केली. त्याच्या याच शतकी खेळीच्या जोरावर उत्तर प्रदेश संघाने २० षटकांत ३ बाद २३५ धावा केल्या आहेत.

आज दुपारच्या सत्रात सुरु झालेल्या या सामन्यात उत्तर प्रदेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. समर्थ सिंग आणि शिवम चौधरी हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या रैनाने आकाशदीप नाथ बरोबर मोठी भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली.

आकाशदीप नाथनेही चांगली कामगिरी करताना ४३ सामन्यात ८३ धावा केल्या. त्याला शतकी खेळी करण्यात अपयश आले आहे. त्यानंतर आलेल्या सर्फराज खानने ३ चेंडूत नाबाद १० धावा केल्या.

रैनाने या खेळीत १३ चौकार आणि ७ षटकार खेचले आहेत. याबरोबर भारतात ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये २०० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये आता रैनाचा समावेश झाला आहे.

भारतात ट्वेंटी२० मध्ये ख्रिस गेलने २८८ तर रोहित शर्माने २०९ षटकार खेचले आहेत. रैनाने आजपर्यंत २०३ षटकार हे भारतात खेचले आहेत.

रैनाने २६५ ट्वेंटी२० सामन्यात ३३.५८पेक्षा जास्तचा सरासरीने ७०५३ धावा केल्या आहेत तर विराट कोहलीने २२६ सामन्यात ४०.८५च्या सरासरीने ७०६८ धावा केल्या आहेत.

७ हजार धावा करणारा रैना हा जगातील केवळ ९ वा खेळाडू आहे.