“क्रिकेटकडे पुन्हा वळणे अजिबात कठीण नाही”: विराट कोहली

भारताचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचे अनुष्का शर्मासोबत नुकतेच लग्न झाले. या लग्नासाठी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सामन्यात त्याने न खेळण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर दिल्ली आणि मुंबई येथे स्वागत समारंभ देखील आयोजित करण्यात आले ज्यात भारताचे आजी माजी क्रिकेटपटू त्यासोबतच चित्रपटसृष्टि मधले कलावंत उपस्थित होते.

यापाठोपाठ आज भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार त्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा विराट म्हणाला भारतीय संघाचा २०१७ मधला प्रवास पाहता तो उल्लेखनीय आहे, सातत्याने जिंकण्याची इच्छाशक्ती आणि विजयाची भूक ही आमच्यात कधीच कमी होणार नाही.

“परदेशात जिंकायचे असेल तर जास्त काळ क्रिकेट खेळणे गरजेचे आहे, आम्ही मागच्या वेळी जे नाही करू शकलो ते आता करायचे आहे” असे विराट म्हणाला.

“क्रिकेट हा खेळ बॅट आणि बॉल सोबत खेळला जातो, तिथल्या परिस्थितीबद्दल काही अडचण नाही, मला माझ्या संघाच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही योग्य मार्गावर आहोत” असे विराट म्हणाला.

विराट म्हणाला “मी माझ्या आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या क्षणासाठी दूर होतो, मात्र मी क्रिकेटपासून कधीच दूर नव्हतो, मी सराव करतच होतो कारण क्रिकेट माझ्या रक्तात आहे.”

भारत ५ जानेवारी २०१८ ते २४ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामने, ६ वनडे सामने, आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.