आयपीएलपूर्वी केकेआरसाठी खुशखबर, या खेळाडूने एकाच ओव्हरमध्ये मारले ५ षटकार

इंदोर। सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीच्या सुपर लीग फेरीत महाराष्ट्र संघाने मंगळवारी(12 मार्च) रेल्वे संघाविरुद्ध 21 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्राच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज निखिल नाईकने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे. तसेच त्याने एकाच षटकात पाच षटकार मारण्याचा पराक्रमही केला आहे.

होळकर क्रिकेट स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 177 धावा केल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रकडून निखिलने 58 चेंडूत नाबाद 95 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 8 षटकारांची बरसात केली.

या 8 षटकारांमधील 5 षटकार तर त्याने 20 व्या षटकात मारले. रेल्वेकडून 20 व्या षटकात अमित मिश्राने गोलंदाजी केली होती. निखिलने या षटकातील पहिल्याच चेंडूवर बॅकवर्ड स्केवरलेगला पहिला षटकार मारला.

त्यानंतर त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन षटकार लाँग ऑनच्या दिशेला मारले. मिश्राने चौथा चेंडू निर्धाव टाकला. पण परत निखिलने पाचव्या चेंडूवर डिप मिड विकेटला आणि सहाव्या चेंडूवर डिप एक्ट्रा कव्हरला षटकार मारत महाराष्ट्राला 177 धावांचा टप्पा गाठून दिला.

या सामन्यात निखिल बरोबरच नौशाद शेखने 39 चेंडूत 59 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यामुळे महाराष्ट्राने रेल्वेसमोर 20 षटकात 178 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रेल्वेला सर्वबाद 156 धावाच करता आल्या.

कोलकता नाईट रायडर्ससाठी आनंदाची बातमी-

या सामन्यात एकाच षटकात 5 षटकार मारणारा निखिल यावर्षी आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. 24 वर्षीय निखिलला आयपीएल लिलावावेळी कोलकता नाईट रायडर्स संघाने त्याच्या 20 लाख या मुळकिमतीत संघात सामील करुन घेतले आहे.

याआधी तो 2016 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. पंजाबकडून त्याने 2 सामन्यात खेळताना 23 धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

हिटमॅन रोहित शर्माला तो खास पराक्रम करण्याची अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही…

मुंबईकर अजिंक्य रहाणेने केले शेतकऱ्यांबद्दल भावनिक आवाहन, पहा व्हिडिओ

आयपीएल सुरु होण्यापुर्वीच सनरायझर्स हैद्राबादला मोठा धक्का, हा दिग्गज खेळाडू जखमी