Video: पंचांमुळे मोठा वाद, सामना झाला टाय, परंतु पुढे घडले हे

विशाखापट्टमण । हैद्राबाद विरुद्ध कर्नाटक सईद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात आज पंचांच्या निर्णयामुळे मोठा वाद झाला. पंचांनी योग्य वेळी बरोबर निर्णय न घेतल्यामुळे हा वाद झाला असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण?
आज हैद्राबादचा कर्णधार आंबटी रायडूने नाणेफेक जिंकून विनय कुमारच्या कर्नाटक संघाला फलंदाजीला पाचारण केले. मोहम्मद सिराजच्या सामन्यातील पहिल्याच षटकात करून नायरच्या एका फ्लिक शॉटवर मेहदी हसन या क्षेत्ररक्षकाने चेंडू सीमारेषा पार करण्याआधी चेंडू अडवला. परंतु रिप्लेमध्ये हसनचा पाय हा सीमारेषेच्या रोपला लागल्याचे स्पष्ट दिसत होते.

असे असतानाही पंच उल्हास गंधे यांनी काहीही निर्णय न घेता करुन नायरने फक्त धावून जमवलेल्या धावाच मोजल्या. त्यामुळे कर्नाटकचा डाव ५ बाद २०३ वर संपुष्टात आला.

जेव्हा कर्नाटक संघ क्षेत्ररक्षणाला आला तेव्हा कर्णधार विनय कुमारने पंचांशी बराच वेळ चर्चा केली. त्याचमुळे कर्नाटकच्या धावसंख्येत २ धावा मिळवून नवीन २०६ धावांचे लक्ष हैद्राबाद संघासमोर ठेवण्यात आले.

विशेष म्हणजे हैद्राबाद संघ बरोबर दोनच धावांनी सामना पराभूत झाला.

हैद्राबादचा कर्णधार आंबटी रायडूने मात्र ही गोष्ट गांभीर्याने घेत सामना झाल्यावर सुपर ओव्हरची मागणी केली. तसेच मैदान सोडण्यासही नकार दिला. यामुळे याच मैदानावर १ वाजता सुरु होणाऱ्या आंध्रप्रदेश विरुद्ध केरळ सामन्याला चांगलाच उशीर झाला.

आंबटी रायडूचे काय होते म्हणणे?
रायडू म्हणाला, “आमचा डाव सुरु होण्यापूर्वी मैदानावर काहीतरी गोंधळ झाला. मी पंचांकडे जाऊन म्हणालो की ‘सर तुम्ही धावा बदलू शकत नाही. आम्ही २०४ धावांचे लक्ष ठेवूनच मैदानावर पाऊल ठेवले होते आणि त्याच धावसंख्येचा पाठलाग करत होतो. त्यावेळी पंच मला म्हणाले की आम्ही सामना संपल्यावर यावर निर्णय घेऊ. आता सामना सुरु करा. “

“जेव्हा सामना संपला तेव्हा आम्ही सुपर ओव्हरची मागणी केली. आमचा दुसरा सामना थांबवायचा कोणताही इरादा नव्हता. आम्हाला त्याबद्दल काही घेणंदेणं नव्हतं. आम्हाला एवढंच सांगायचं होत की सामना अजून संपलेला नाही. आम्हाला सुपर ओव्हरमध्ये खेळू द्यावे. हेच आम्ही सांगत होतो आणि त्यानंतर आम्ही सरावाला निघून गेलो. “

Video:

संक्षिप्त धावफलक:
कर्नाटक: ५ बाद २०५, करून नायर ७७
हैद्राबाद: ९ बाद २०३, अक्षत रेड्डी ७०

कर्नाटक संघ २ धावांनी विजयी