युवराज सिंगचा धडाका सुरूच, मुंबईला चारली पराभवाची धूळ

कोलकाता । भारताचा महान अष्टपैलू खेळाडू आणि पंजाब संघाचा कर्णधार युवराज सिंगने आज मुंबई विरुद्ध चांगली खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला. त्याने आज ३४ चेंडूत ४० धावांची खेळी केली.

कर्णधार युवराजने आज नाणेफेक जिंकून मुंबई संघाला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत ४ बाद १९८ धावा केल्या. मुंबईकडून सलामीवीर अखिल हेरवाडकरने ४२ तर जय बिस्टने २४ धावा करत मुंबईला चांगली सुरुवात करून दिली.

गेल्याच महिन्यात भारतीय संघातून पदार्पण केलेल्या श्रेयस अय्यरने ४४ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. त्यामुळे मुंबई मोठी धावसंख्या उभारू शकली.

१९९ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब संघाला ४२ धावांची सलामी दिली. हरभजनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवायचा निर्णय आज मात्र बऱ्यापैकी चुकला. तो ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर युवराज आणि गुरकिरत मान यांनी जास्त पडझड होऊ दिली नाही.

युवराजने ४० तर गुरकिरत मानने २१ धावा केल्या. पंजाब संघाने ४ चेंडू बाकी ठेवून हे लक्ष पार केले.

या ट्रॉफीमध्ये युवराजने पंजाबने ४०, २९, २१, ४, ८, ३५* आणि ५०* धावा केल्या आहेत.