टाकादेवी स्पोर्ट्स क्लब, मांडावा आयोजित रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व टाकादेवी स्पोर्ट्स क्लब व ग्रामस्थ मंडळ मांडवा आयोजित स्व. सौ. निलम निशिकांत दळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य कबड्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ही कबड्डी स्पर्धा जिल्हा पातळीवर खेळवण्यात येणार असून पुरुष व महिला अश्या दोन्ही गटाच्या स्पर्धा होणार आहेत.

टाकादेवी स्पोर्ट्स क्लब, मांडावाच्या मैदानावर दिनांक १६ मार्च व १७ मार्च या कालावधीत सदर स्पर्धा होणार असून पहिल्या दिवशी महिला गटाचे तर दुसऱ्या दिवशी पुरुष गटाचे सामने खेळवण्यात येतील. सामने ठीक दुपारी २ वाजता सुरू होतील. ही स्पर्धा मातीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. महिलांचे १६ तर पुरुषांचे जवळपास ४०-४५ संघ सहभागी होण्याची शक्यता आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पुरुष विभागातील अंतिम विजयी संघास रोख ३०,००० रुपये, उपविजयी संघास २०,००० रुपये, उपांत्य पराभूत संघास १५,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उपांत्यपूर्व फेरीत पराभूत संघास प्रत्येकी ५ ,००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. तर महिला विभागातील अंतिम विजयी संघास रोख रुपये १०,००० रुपये, उपविजयी संघास ७,००० रुपये, उपांत्य पराभूत संघास ५,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. दोन्ही विभागातील मालिकवीर, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड अशी बक्षिसे असणार आहेत.