मोसमाची सांगता थायलंडमध्ये करण्यास संजय सज्ज

पुणे: पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले मोसमाची सांगता थायलंडमध्ये करण्यास सज्ज झाला आहे. थायलंड प्री रॅली मालिकेतील अखेरच्या फेरीत तो भाग घेईल. मोसमाचा प्रारंiभ त्याने फेब्रुवारीत थायलंडमध्येच केला होता. कांचनाबुरी या ऐतिहासिक प्रांतात येत्या शनिवारी-रविवारी ही रॅली होईल.

संजय इसुझु डीमॅक्स युटीलीटी कार चालवेल. तो फोर बाय फोर ओपन क्लासमध्ये भाग घेईल. थायलंडचा मिनील थान्याफात त्याचा नॅव्हीगेटर असेल. संजयने सांगितले की, गेली आठ-दहा वर्षे मी थायलंडमध्ये रॅली करीत आहे. कांचनाबुरी प्रांतातील रॅलीत मी प्रथमच भाग घेईन. ब्रीज ऑन रिव्हर क्वाय या प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटाचे चित्रीकरण या भागात झाले होते.

टीम इसुझू फुकेटने कार सुसज्ज केली आहे. विचाई वात्ताहाविशुथ हे या संघाचे प्रमुख आहेत. ते ट्यूनर सुद्धा आहेत. थायलंडमधील रॅली संजयसाठी फार महत्त्वाच्या आहेत. याविषयी त्याने सांगितले की, जागतिक रॅली मालिकेत सहभागाचे एक स्वप्न यंदा मी फिनलंडमध्ये साकार केले. माझी आणखी एक महत्त्वाकांक्षा आहे आणि ती म्हणजे डकार रॅली. त्यासाठी मला थायलंडमध्ये सराव करण्याची गरज आहे. इसुझु डीमॅक्स युटीलीटी कारमधून सराव करणे खडतर अशा डकार रॅलीच्या तयारीसाठी फायदेशीर ठरेल.

जूनमधील फेरीत त्याने टायर अचूक पसंतीचे नसूनही दुसरा क्रमांक मिळविला होता. तेव्हा संजयच्या संघाने चिखलमय मार्गासाठी वापरली जाणारी कठिण टायर बसविली होती, प्रत्यक्षात मार्ग मऊ वाळूचा होता. अशावेळी संजयने कौशल्य पणास लावत कार नियंत्रीत केली. त्यामुळे तो फोर-बाय-फोर खुल्या गटात हे यश मिळवू शकला.