तमिळ थलायवाज आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

प्रो कबड्डीचा मुक्काम आज नागपूर येथे आला आहे. या वेळी बेंगळुरू बुल्स संघाचे घरचे मैदान नागपूर शहर असणार आहे. बंगळुरू बुल्स घरच्या मैदानावरील आपला पहिला सामना तामिळ थलायवाज विरुद्ध खेळणार आहे. तामिळ संघाने या स्पर्धेतील उद्धघाटनाचा सामना तेलगू टायटन्स विरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात तामिळ थलायवाज संघाला हार पत्करावी लागली होती.

या उलट बंगळुरू बुल्स संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्सला हरवले होते आणि ५ गुणांची कमाई केली होती. तामिळ संघाकडे अजय ठाकूर आणि अमित हुड्डा हे एकहाती सामना फिरवणारे खेळाडू जरी असले तरी या सामन्यात बंगळुरू संघाचे पारडे जड वाटत आहे.

बंगळुरू संघाकडे रोहित कुमार आणि अजय कुमार या उत्तम रेडरची जोडी आहे. हे दोन रेडर सामन्याचा निकाल बेंगळुरू बुल्सच्या बाजूने लावण्यात सक्षम ठरतील. बुल्सचा डिफेन्सही त्यांची ताकद ठरू शकतो कारण या संघाकडे रविंदर पहल हा प्रो कबड्डीमधील सर्वोत्तम डिफेन्डर्स पैकी एक आहे. त्याबरोबरच या संघातील आशिष सांगवान आणि महेंदर सिंग यांनी मागील सामन्यात आपले कौशल्य दाखवले आहे.