थलाइवाज की योद्धा? आज होणार रोमहर्षक सामना

आज प्रो कबड्डीमधील ७५वा सामना तमील थलाइवाज आणि यु.पी.योद्धा या दोन संघात होणार आहे. या सामन्याच्या अगोदर झोन बी मधील हे संघ एका सामन्यासाठी समोरासमोर आले होते. तो सामना बरोबरीत सुटला होता. त्या सामन्यात यु.पी.योद्धाच्या रिशांक देवाडीगा याने उत्तम खेळाचे प्रदर्शन करताना १६ गुण मिळवले होते. त्यातील १४ गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले होते. या सामन्यात तमीलकडून अजय ठाकूरने सुपर टेन कमावला होता.

यु.पी.योद्धा संघाची कामगिरी कधी तळ्यात तर कधी मळ्यात अशी झालेली आहे. या संघात सातत्य नाही आहे. घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. सहा सामन्यांपैकी सलग पाच सामन्यात पराभव सहन करावा लागला होता. तर सहावा सामना बरोबरीत सोडवण्यात त्यांना यश आले होते.

या संघाने खेळलेल्या मागील पाच सामन्यात तीन सामने बरोबरीत सोडवले आहेत. तर मागील दोन्ही सामने त्यांनी बरोबरीत सोडवले आहेत. रेडींग हा या संघाचा मजबूत पक्ष आहे. सामन्याचा निकाल आपल्याबाजूने लावायचा असेल तर नितीन तोमर, रिशांक देवाडीगा यांना रेडींगमध्ये उत्तम कामगिरी करावी लागणार आहे. डिफेन्समधील खराब कामगिरी या संघाची डोकेदुखी ठरत आहे. राजेश नरवाल याला या मोसमात अजून छाप पाडता आलेली नाही.

तमील संघाने मागील पाच सामन्यात मिळवला नाही. चार सामन्यात पराभव तर एक सामना बरोबरीत अशी कामगिरी या संघाने केली आहे. मागील तीन सामन्यात त्यांना सलग तीन पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा संघ रेडींगमध्ये कमकुवत भासतो आहे. या संघासाठी रेडींगमध्ये गुण मिळवण्याच्या क्षमतेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. अजय ठाकूर, के प्रपंजन यांनी काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. मोसमाच्या सुरुवातीला के.प्रपंजन यांने चांगली कामगिरी केली होती. अजय ठाकूरने यु.पी.योद्धा विरुद्धच्या सामन्यात उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे या सामन्यात देखील त्याच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

या सामन्यात यु.पी.योद्धा संघाला विजयाची जास्त संधी असणार आहे. राजेश नरवाल याने या सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे. तमील थलाइवाज संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर अजय ठाकूर के. प्रपंजन आणि अमित हुड्डा यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.