तमिम इक्बाल दुखापातीमुळे एशिया कपमधून बाहेर

काल एशिया कप स्पर्धेला मोठ्या धडाक्यात सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात बांग्लादेशाने श्रीलंकेचा 137 धावांनी पराभव केला. यात मुशफिकूर रहिमने शानदार शतक झळकावले. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही पातळ्यांवर बांग्लादेशाच्या संघाने अव्वल दर्जाचा खेळ केला.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरंगा लकमलने टाकलेल्या सामन्याच्या दुसऱ्या षटकात सलामीचा फलंदाज तमिम इक्बालच्या मनगटाला दुखापत झाली.

त्यामुळे मैदानावर त्वरीत फिजिओना बोलवण्यात आले. त्यानंतर तो 3 चेंडूत 2 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्याच्या हाताचा स्कॅन करण्यात आला तेव्हा त्याच्या डाव्या हाताच्या मनगटात फ्रॅक्चर आहे हे समजले.

पण त्यानंतरही तो 47 व्या षटकात बांगलादेश 9 बाद 229 धावांवर असताना पुन्हा फलंदाजीसाठी आला. त्याने डाव्या हाताच्या ग्लोव्हला विशेष पॅडचा आधार दिला होता जेणेकरुन त्याला खेळता येईल.

त्याने यात एकाच हाताने फलंदाजी करताना एकच चेंडू खेळला आणि एकही धाव केली नाही. रहिमसोबत 32 धावांची भागीदारी केली. संघाला गरज होती तेव्हा गंभीर दुखापत झाली असताना तो मैदानावर उतरला.

त्याच्या फ्रॅक्चरचा अंदाज घेतल्यावर तमिम इक्बाल आता जवळजवळ सहा आठवडे क्रिकेटपासून दूर रहाणार असल्याचे समजले आहे. तमिम स्पर्धेत पुढे खेळू शकणार नसल्याने त्याच्या जागी नझमुल हुसेन शांतो याला संघात स्थान देण्यात आले आहे.

शांतो बोटाच्या दुखापती मधून सावरला असल्याचे बांग्लादेश क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष मिनाजुल अबेदिन यांनी ईएसपीएन क्रिक इन्फो या वाहीनीला सांगितले.

सामन्यात परत खेळण्याचा निर्णय तमिमचा होता. त्यामुळे त्याचे सर्व श्रेय त्यालाच जाते. असे बांग्लादेशाचा कर्णधार मशरफी मोर्तुझा याने सांगितले.

या 29 वर्षीय खेळाडूने बांग्लादेशाकडून 11 शतके 42 अर्धशतके केली आहेत. बांग्लादेशाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. स्पर्धेत तमिम इक्बालची उणीव संघाला नक्कीच जाणवेल यात शंका नाही.