अबब! एकट्याच्या नाबाद १०४५ धावा, झाला विश्वविक्रम!

मुंबई आणि क्रिकेटचे विक्रम हे आता जुने समीकरण झाले आहे. फलंदाजीच्या बाबतीत तर ह्या शहरातील विक्रम हे जगातील सर्वश्रेष्ठ विक्रम ठरले आहेत. आजही क्रिकेटमधील एक खास विक्रम याच शहरात झाला.

नवी मुंबईमधील शालेय क्रिकेटमध्ये आज तनिष्क गवतेने चक्क १०४५ धावा केल्या. त्याने १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत हा विक्रम केला. विशेष म्हणजे या खेळीत तो नाबाद राहिला.

तनिष्क हा ग्रीन बॉम्बे संघाचा कर्णधारही आहे.

यापूर्वी शालेय क्रिकेटमध्ये ४-५ जानेवारी २०१६ रोजी प्रणव धनावडेने ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावा केल्या होत्या. अधिकृत शालेय सामन्यात १००० धावा करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला होता. त्यानंतर आज २ वर्षांनी हा विक्रम आता तनिष्कच्या नावावर झाला आहे.

प्रणव धनावडेने हा विक्रम जेव्हा केला होता तेव्हा तो १५ वर्षांचा होता. तर तनिष्क गवतेने हा विक्रम १४व्या वर्षीच केला आहे.

प्रणवने जेव्हा १००९ धावा केल्या होत्या तेव्हा त्याने १८९९ मधील इंग्लंड देशात बनलेला ६२८ धावांचा विक्रम मोडला होता. १९८८मध्ये एइजे कॉलिन्सने क्लार्क हाऊसकडून नॉर्थ टाउनविरुद्ध खेळताना केलेला नाबाद ६२८ धावांचा विक्रम केला होता. हा विक्रम तब्बल ११७ वर्षांनी प्रणवने मोडला होता. प्रणवचा हाच विक्रम मोडायला तनिष्कला केवळ २ वर्ष लागली. कोणत्याही क्रिकेटच्या प्रकारात केलेल्या ह्या सर्वोच्च धावा आहेत.

मुंबई सकूल क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आता तनिष्क गवते (नाबाद १०४५) अव्वल स्थानी असून त्यानंतर प्रणव धनावडे (नाबाद १००९) आणि पृथ्वी शॉ (५४६) यांचा क्रमांक लागतो.