टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचा सोफोशसाठी खास उपक्रम

प्रत्येक बिनतोड सर्व्हिसमागे सोफोशला साहाय्य देणार

पुणे । टाटा ओपन महाराष्ट्रच्या स्पर्धेच्या संयोजकांनी आज सोफोश(सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटल) या पुण्यातील प्रख्यात स्वयंसेवी संस्थेची आपला एनजीओ भागीदार म्हणून घोषणा केली. ही संस्था श्री वत्स या बालकांसाठी सुरु असलेल्या केंद्रात अनाथ मुलांसाठी पुनर्वसन आणि विकासाचे कार्य करत असते.

तसेच या स्पर्धेमध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक बिनतोड सर्व्हिसमागे(एस) सोफोश या संस्थेला मदत देण्यात असल्याची घोषणा संयोजकांनी केली

तारा सोफोश ढफळे सेंटर हे पिंपळे गुरव येथे स्थापित असून विशेष मुलांसाठी कार्य करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. सोफोश ही संस्था ससून रुग्णालयातील रुग्णांना औषधउपचार, समुपदेशन, गरज लागल्यास आर्थिक हातभार आणि पायाभूत सुविधांसाठीही विशेष करून साहाय्य करीत असते. यासाठी सोफोशच्या रुग्णकल्याण विभागातून मदत देण्यात येते असे सोफोशच्या उपाध्यक्षा डॉ. कविता करीर यांनी सांगितले.

स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार यावेळी म्हणाले कि, या स्पर्धेच्या निम्मिताने आम्ही पुणेकरांना केवळ टेनिसची मेजवानी देणार नसून समाजावर वेगळ्या प्रकारे प्रभाव टाकण्यासाठी आम्ही भागीदार म्हणून सोफोशची निवड केली आहे. सोफोशशी असलेल्या भागीदारीतून आम्ही गरजूंना मदत करू इच्छितो. या स्पर्धेतील प्रत्येक बिनतोड सर्व्हिसमागे सोफोशला एका ठराविक रकमेची देणगी देण्यात येणार आहे . प्रत्येक बिनतोड सर्व्हिसमागे सोफोशला शक्य तितके मदत करण्याचे आव्हाहन आम्ही टेनिस प्रेमींना करीत आहोत.

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, क्रीडा क्षेत्रामध्ये जगाला बदलविण्याची ताकद आहे, असे नेल्सन मंडेला म्हणाले होते. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात मोठा बदल घडविण्यासाठी खेळाचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न असून विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 डिसेंबर 2018 ते 5 जानेवारी 2019 या कालावधीत होणार आहे. स्पर्धेत गतविजेता व विश्व क्रमवारीत 30व्या क्रमांकाचा फ्रेंच खेळाडू सिमॉन जाईल्स तसेच, जागतिक क्र.6खेळाडू केविन अँडरसन(दक्षिण अफ्रिका), जागतिक क्र.25खेळाडू हुयोन चूँग आणि जागतिक क्र. 45खेळाडू मालेक झाजेरी(ट्युनेशिया) हे दिग्गज खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.