देवासाठी क्रिकेट सोडलेला क्रिकेटर मुलासाठी करतोय पुनरागमन

6 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला आणि झिम्बाब्वेचा माजी कर्णधार तातेंदा तायबू पुन्हा एकदा स्पर्धांत्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने निवृत्ती स्विकारल्यानंतर तो मार्च 2018 पर्यंत झिम्बाब्वे संघाच्या निवड समीतीमध्येही होता.

पण आता त्याने श्रीलंकेच्या बदुरालीया सीसी या देशांतर्गत संघाशी येत्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या हंगामासाठी करार केला आहे. याबद्दल त्याने इएसपीएन क्रिकइन्फोला माहिती दिली आहे.

तायबुला वयाच्या 21 व्या वर्षीच कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे तो सर्वात तरुण कसोटी कर्णधार ठरला होता. पण त्याने 2012 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केले होते. त्याने ही निवृत्ती चर्चमधील कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी घेतली होती.

यष्टीरक्षक फलंदाज असणाऱ्या तायबूने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रेरित करण्याचे एक कारण म्हणजे त्याला त्याच्या मुलाने कधीही खेळताना पाहिले नव्हते.

याबद्दल तायबू म्हणाला, ‘माझा मुलगा तातेंदा ज्यूनियर मला बऱ्याचदा विचारतो मी कसा खेळायचो. त्याला आता हा खेळ आवडायला लागला आहे. त्याला मला खेळताना पहायची जास्त संधी मिळालेली नाही. तो त्यावेळी खूप लहान होता. मी खूप फिट आणि निरोगी आहे आणि मला वाटते की मी अजूनही फिट असणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यामुळे मला वाटते की माझा मुलगा आता मला खेळताना त्याच्यासाठी पाहू शकेल.’

तायबूच्या निवृत्तीनंतर तो यूनायटेड किंगडममध्ये(यूके) स्थायिक झाला आहे. जिथे त्याने 2016 ला क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्याने लिव्हरपूल आणि डिस्ट्रिक्ट टीम हायटाउन सेंट मेरी संघाबरोबर खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून करार केला होता.

त्यानंतर त्याने 2017 मध्ये प्रशासनामध्येही प्रवेश केला होता. तो त्यावर्षी झिम्बाब्वे क्रिकेटच्या निवड समीतीचा संयोजक आणि विकास अधिकारी झाला. 

पण त्याला यावर्षीच्या सुरुवातीला झिम्बाब्वेच्या निवड समीती अध्यक्षपदावरुन काढण्यात आले, त्याच्याबरोबरच प्रशिक्षक हेथ स्ट्रेक आणि कर्णधार ग्रॅमी क्रिमर यांनाही काढून टाकण्यात आले आहे. कारण झिम्बाब्वेला 2019 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरता आले नाही.

तसेच तायबूने यूकेमध्ये स्थायिक असताना हरारेमध्ये असलेली रायझिंग स्टार्स अॅकॅडमीचीही स्थापना केली. यासाठी त्याला झिम्बाब्वे क्रिकेटने आणि काही खाजगी प्रायोजकांनी निधीही दिला होता. या अॅकॅडमीने एका इंग्लिश स्पोर्ट्स एजन्सीबरोबर सहयोग केला आणि झिम्बाब्वेमधील काही निवडक उत्कृष्ट खेळाडूंसाठी आश्वासक क्लब करार केला आहे.

तायबूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 कसोटी सामन्यात 1546 धावा, 150 वनडे सामन्यात 3393 धावा आणि 17 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 259 धावा केल्या आहेत. त्याने झिम्बाब्वेकडून 23 जून 2001 ला विंडीज विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. तसेच त्याने झिम्बाब्वेकडून शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध 14 फेब्रुवारी 2012 ला खेळला.

महत्त्वाच्या बातम्या:

सहा वर्षाच्या चिमुकल्याचा भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलियन संघात समावेश

आयपीएल २०१९च्या लिलावासाठी या शहरावर झाले शिक्कामोर्तब

भारत विरुद्धच्या सामन्याआधी या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बसला मोठा धक्का