रविंद्र जडेजाचे न्यूझीलंड विरुद्ध शानदार अर्धशतक, अन्य फलंदाजांची कामगिरी मात्र सुमार

आज भारताचा विश्वचषक 2019 मधील सराव सामना न्यूझीलंड विरुद्ध द ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 39.2 षटकात सर्वबाद 179 धावा केल्या आहेत. भारताकडून अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने अर्धशतकी खेळी केली आहे.

त्याने या सामन्यात 50 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 54 धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने 9 व्या विकेटसाठी कुलदीप यादव बरोबर 62 धावांची भागीदारीही केली. जडेजा या सामन्यात फलंदाजीला आला तेव्हा भारताची आवस्था 81 धावांवर 6 बाद अशी होती.

त्यानंतर त्याने भारताचा डाव सावरताना भारताला 150 पेक्षा अधिक धावांचा टप्पा गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तो कुलदीपला साथीला घेत भारताचा डाव भक्कम करत असताना त्याला 56 धावांवर लॉकी फर्गुसनने बाद केले. जडेजाचा झेल पॉइंटला उभ्या असणाऱ्या मार्टीन गप्टिलने सुरेख रित्या टीपला.

जडेजा व्यतिरिक्त अन्य भारतीय फलंदाजांना खास काही करता आले नाही. फक्त हार्दिकने 30 धावांची छोटेखानी खेळी केली. मात्र तोही लवकर बाद झाला. भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन प्रत्येकी 2 धावा करुन माघारी परतले.

तर कर्णधार विराट कोहलीने 18 धावा केल्या. तसेच चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या केएल राहुललाही 6 धावाच करता आल्या. त्याचबरोबर संयमाने फलंदाजी करणारा एमएस धोनीही 17 धावा करुन बाद झाला. तसेच दिनेश कार्तिकने फक्त 4 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स निशामने तीन तर टिम साऊथी, कॉलीन डि ग्रँडहोम आणि लॉकी फर्ग्यूसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विजय शंकरच्या दुखापतीबद्दल असा आला रिपोर्ट, बीसीसीआयने दिली माहिती

विश्वचषक २०१९: एकाच दिवसात हे चार खेळाडू झाले दुखापतग्रस्त

जेव्हा क्रिकेट-फुटबॉलमधील दोन दिग्गज भेटतात एकमेंकांना…