पहिली टी २०: भारताचा श्रीलंकेवर मोठा विजय

कटक। भारत विरुद्ध श्रीलंका संघात बाराबती स्टेडिअमवर पार पडलेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ९३ धावांनी विजय मिळवला. युझवेंद्र चहलने ४ बळी घेत भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली आहे. भारताचा धावांच्या तुलनेत हा सर्वात मोठा विजय आहे.

भारताने दिलेल्या १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर निरोशान डिकवेल्लाला(१३) जयदेव उनाडकटने के एल राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र उपुल थरंगा(२३) आणि कुशल परेरा(१९) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात त्यांनी आपल्या विकेट गमावल्या.

थरंगाला चहलने तर कुशल परेराला कुलदीप यादवने यष्टीरक्षक एम एस धोनीकरवी झेलबाद केले. यानंतर मात्र एकही श्रीलंकन फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. कुशल परेरानंतर खेळायला आलेल्या फलंदाजांपैकी दुष्मानथा चमिरा(१२) सोडला तर एकही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्याही करता आली नाही.

चहल आणि कुलदीप या जोडीने उत्तम गोलंदाजी करताना श्रीलंकेच्या फलंदाजीला तडा दिला. या दोघांनी मिळून ६ बळी घेतले. चहलने २३ धावा देत ४ बळी घेतले. कुलदीपने १८ धावात २ बळी घेतले.

याबरोबरच हार्दिक पंड्यानेही २९ धावात ३ बळी घेतले आणि उनाडकटने १ बळी घेतला. या उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीवर भारताने श्रीलंकेला १६ षटकात ८७ धावातच सर्वबाद केले.

तत्पूर्वी भारताकडून रोहित शर्मा(१७), के एल राहुल(६१), श्रेयश अय्यर(२४), एम एस धोनी(३९*) आणि मनीष पांडे(३२*) यांनी धावा केल्या. या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १८० धावा केल्या होत्या.