भारताचा दुसऱ्या वनडेत शानदार विजय

सेंच्युरियन। भारताने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज शिखर धवनने अर्धशतक केले, तसेच भारताकडून युझवेन्द्र चहलने ५ बळी घेऊन भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ११९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान भारताने २०.३ षटकातच फक्त एका बळीच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आजही लवकर बाद झाला. त्याला १५ धावांवर असताना कागिसो रबाडाने बाद केले.

त्यानंतर मात्र धवन आणि कर्णधार विराट कोहलीने बळी न गमावता भारताला सहज विजय मिळवून दिला. धवनने ५६ चेंडूत नाबाद ५१ धावा तर कोहलीने ५० चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची नाबाद भागीदारी रचली.

भारताला जिकंण्यासाठी फक्त २ धावांची गरज असताना लंच ब्रेक झाल्याने भारताचा विजय आणखी लांबला गेला होता. दक्षिण आफ्रिकेच्या डावानंतर ब्रेक झाला नसल्याने हा ब्रेक देण्यात आला होता. परंतु सामना संपतच आला होता आणि हा ब्रेक झाल्याने प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज झाले होते.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आपले बळी नियमित अंतराने गमावले. त्यांच्याकडून जेपी ड्युमिनी आणि आज पदार्पण करणारा खाया झोन्डो यांनीच बऱ्यापैकी लढत दिली मात्र त्यांनाही डावाला आकार देण्यात अपयश आले. या दोघांनीही प्रत्येकी २५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील याच वयक्तिक सर्वाधिक धावसंख्या ठरली.

बाकी फलंदाजांपैकी हाशिम अमला(२३) आणि क्विंटॉन डिकॉक(२०) ख्रिस मॉरिस(१४) यांनी धावा केल्या. आजच कर्णधारपद स्वीकारलेल्या एडिन मार्करमलाही(८) खास काही करता आले नाही. दक्षिण आफ्रिकेचे तब्बल ५ फलंदाज दोन आकडी धावसंख्याही न गाठता बाद झाले.

भारताकडून चहल(५/२२), कुलदीप यादव(३/२०), भुवनेश्वर कुमार(१/१९) आणि जसप्रीत बुमराह(१/१२) यांनी बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेला ३२.२ षटकात ११८ धावांवर सर्वबाद केले.