पाकिस्तानवर दणदणीत विजयासह भारत अंतिम फेरीत, विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाशी लढणार

१९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानचा दणदणीत २०३ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता ३ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना ऑस्ट्रेलिया संघाबरोबर होणार आहे.

भारताने आज प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान समोर ५० षटकांत २७३ धावांचे लक्ष ठेवले होते. परंतु पाकिस्तानचा संपूर्ण डावच २९.३ षटकांत ६९ धावांवर संपुष्ठात आला.

भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानने अक्षरशः नांगी टाकली. रोहेल, नजीर मुहम्मद मुसा आणि साद खान सोडून पाकिस्तानकडून कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. नजीरने ३९ चेंडूत १८ धावा केल्या. हीच पाकिस्तानच्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

भारताकडून ईशान पोरेल या गोलंदाजाने 6 षटकांत 17 धावा देत 4 विकेट्स घेतल्या तर रियान परागने २ , शिवा सिंगने २ तर अनुकूल रॉयने १ आणि अभिषेक शर्मा १ यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी आज कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय सार्थ ठरवताना भारताकडून स्वतः कर्णधार पृथ्वी शॉने ४१ तर मनजोत कार्लाने ४७ धावा करत १५.३ षटकांत ८९ धावांची सलामी दिली.

त्यानंतर शुभमन गिलने १०२ धावांची नाबाद शतकी खेळी केली. ९४ चेंडूत त्याने ७ चौकार मारताना त्याने हे शतक साजरे केले.

१९ वर्षांखालील विश्वचषकात शुभमन गिलने सलग चौथ्या सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. असे करणारा तो केवळ जगातील केवळ दुसरा खेळाडू बनला आहे.

तसेच १९ वर्षांखालील विश्वचषकात भारत पाकिस्तान सामन्यात शतक करणाराही तो पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सलमान बटने २००२मध्ये नाबाद ८५ धावा केल्या होत्या.

भारताकडून अन्य खेळाडूंना विशेष चमक दाखवता आली नाही. खालच्या फळीत केवळ अनुकूल रॉयने केवळ ३३ धावा केल्या. तब्बल ५ फलंदाज एकेरी धावांवर बाद झाले.

पाकिस्तानकडून मोहम्मद मुसाने ४ तर अर्शद इक्बालने ३ विकेट्स घेतल्या. भारताने २७० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्यावर १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये कधीही पराभूत झाले नाहीत.