कर्नाटकने जिंकले १५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे अजिंक्यपद

पुणे । १५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे अजिंक्यपद कर्नाटक संघाने मिळवले. कर्नाटक संघाने यंदाच्या हंगामात एकूण २० पदके मिळवली.(७ सुर्वण, 9 रौप्य आणि ४ कास्य पदके). महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला असून महाराष्ट्राच्या संघाने एकूण १२ पदके मिळवली. (४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कास्य पदके).

पुण्यातील सनीस वर्ल्ड येथे २६ ते २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत १५ व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमास सायकलिंग फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल ओंकार सिंग, जायंट स्टारकेनचे एमडी आणि सीईओ श्री प्रवीण पाटील, सायकलिंग फेडरेशनचे खजिनदार आणि स्पर्धेचे संयोजक श्री प्रताप जाधव सनीज वर्ल्डचे प्रमुख श्री विनायक निम्हण आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड उपस्थित होते.

पारितोषिक वितरणप्रसंगी बोलताना श्री ओंकार सिंग, सेक्रेटरी जनरल, सायकलिंग फेडरेशन म्हणाले, ” या वर्षीची एमटीबी सायकलिंग स्पर्धा गेल्या काही वर्षीच्या स्पर्धेच्या तुलनेत जास्ती उत्साहात झाली यचे प्रमुख कारण या वर्षी या स्पर्धेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद. या वर्षी आम्ही आणि जायंटस्टारकेन ने मिळून यंदाचा स्पर्धेचा ट्रॅक हा अधिक आव्हानात्मक केला होता. यावर्षी सनीज वर्ल्डच्या रूपात आम्हाला उत्तम असा परिसर ट्रॅक तयार करण्यासाठी मिळाला. मी श्री प्रवीण पाटील यांचा अत्यन्त आभारी आहे जे आमच्यासोबत गेली अनेक वर्षे काम करत आहेत आणि या स्पर्धेचे आयोजन पुण्यात करत आहेत. त्यांच्या सारख्या लोकांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला सायकलिंगचा प्रसार संपूर्ण भारतभर करण्यास मदत होते. पुढील वर्षी हि स्पर्धा अजून एका मोठ्या उंचीवर जाऊन पोचेल असा मला ठाम विश्वास आहे आणि आपल्या देशाचे सायकलिंग मधील भविष्य उज्वल आहे.”

या प्रसंगी बोलताना श्री प्रवीण पाटील एमडी आणि सीईओ स्टारकेन स्पोर्ट्स म्हणाले, ” यावर्षीच्या प्रतिसादाबद्दल आम्ही अतिशय आनंदी आहोत. आजपर्यंतच्या या स्पर्धेच्या इतिहासात यंदा सगळ्यात जास्ती स्पर्धकांचा प्रतिसाद या स्पर्धेस लाभला. साधारण ६०० हुन अधिक स्पर्धक आणि २३ हुन अधिक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावर्षी आम्ही स्पर्धेचा ट्रक अधिक खडतर केला होता जेणेकरून त्याचा फायदा आमच्या स्पर्धकांना भविष्यातील राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी होईल. सनीज वर्ल्ड सारखे उत्तम ठिकाण आम्हाला या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल मी श्री विनायक निम्हण आणि सनी निम्हण यांचा मनापासून आभारी आहे. लवकरच एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा पुण्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून दरवर्षी वाढणारा प्रतिसाद आमचे सर्वांचेच मनोबल उचांवणारे आहे. आम्ही भविष्यात देखील एमटीबी चे आयोजन करत राहू आणि सायकलिंग या खेळाचा देशभरात प्रसार करण्यास लागेल ती मदत करण्यास कटिबद्ध आहोत.”