ISL 2018: दिल्लीला हरवित ब्लास्टर्सची पाचव्या क्रमांकावर झेप

कोची । हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात शनिवारी केरळा ब्लास्टर्सने नेहरू स्टेडियमवरील घरच्या मैदानावर दिल्ली डायनॅमोजला 2-1 असे हरविले. या विजयासह ब्लास्टर्सने गुणतक्त्यात पाचवे स्थान गाठले.

ब्लास्टर्सला पुर्वार्धात पेनल्टीचा फटका बसला. कालू उचे याच्या गोलमुळे दिल्लीने खाते उघडले होते, पण ब्लास्टर्सने मध्यंतराच्या एका गोलच्या पिछाडीनंतर उत्तरार्धात दोन गोल करीत विजय खेचून आणला. यात बदली खेळाडू दिपेंद्र नेगी याची कामगिरी बहुमोल ठरली. त्याने ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली. मग त्याच्यामुळे पेनल्टी सुद्धा मिळाली. त्यावर कॅनडाचा हुकमी स्ट्रायकर इयन ह्युम याने केलेला गोल ब्लास्टर्सकरीता निर्णायक ठरला.

रेने म्युलेस्टीन यांना हटवून मुख्य प्रशिक्षक म्हणून डेव्हिड जेम्स यांना पाचारण केल्यानंतर ब्लास्टर्सने सहा सामन्यांत तिसरा विजय मिळविला. मागील दोन सामने गमावल्यानंतर या विजयासह ब्लास्टर्सने आव्हान कायम राखले.

ब्लास्टर्सने ­13व्या सामन्यात चौथा विजय नोंदविला. पाच बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे 17 गुण झाले. जमशेदपूर एफसी (12 सामन्यांतून 16) आणि मुंबई सिटी एफसी (11 सामन्यांतून 14) यांना मागे टाकत ब्लास्टर्सने दोन क्रमांक प्रगती करीत पाचवे स्थान गाठले. दिल्लीला 12 सामन्यांत नववा पराभव पत्करावा लागला. सात गुणांसह त्यांचे शेवटचे दहावे स्थान कायम राहिले.

पुर्वार्धात 34व्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या प्रशांत के याने दिल्लीच्या सैत्यसेन सिंगला पाठीमागून पाडले. त्याबद्दल प्रशांतला यलो कार्ड, तर दिल्लीला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर कालूने किक मारण्यापूर्वी धुर्तपणे अंदाज घेत ब्लास्टर्सचा गोलरक्षक शुभाशिष रॉय हालचाल करेपर्यंत वाट पाहिली. शुभाशिष उजवीकडे हालताच कालूने डावीकडून चेंडू नेटमध्ये मारत पेनल्टी सत्कारणी लावली.

दुसऱ्या सत्रात ब्लास्टर्सचे डेव्हिड जेम्स यांनी 46व्या मिनिटाला करण सहानी याच्याऐवजी दिपेंद्र नेगीला बदली खेळाडू म्हणून उतरविले. दिपेंद्रने दोन मिनिटांत प्रशिक्षकांचा निर्णय सार्थ ठरविला. जॅकिचंद सिंगने कॉर्नरवर कालू हेडींगने चेंडू बाहेर घालविण्यापूर्वीच दिपेंद्रने चपळाई दाखवित पायाने चेंडू नेटमध्ये मारला.

74व्या मिनीटाला दिल्लीच्या प्रतिक चौधरीने दिपेंद्रला पेनल्टी क्षेत्रात पाडले. त्यामुळे ब्लास्टर्सला पेनल्टी बहाल करण्यात आले. त्यावर ह्युमने एकाग्रतेने अचूक फटका मारत गोल नोंदविला. पाच मिनिटे बाकी असताना लोकेन मैतेईने अप्रतिम क्रॉस पास दिला होता, पण त्यावेर गुडजोन बाल्डव्हिन्सन याने मारलेला फटका अचूक नव्हता. त्यामुळे दिल्लीचा गोलरक्षक अर्णब दास शर्मा याने चेंडू सहज अडविला.
दिल्लीच्या प्रतिकला त्यानंतर भरपाई वेळेत गुडजोनला ढकलल्याबद्दल दुसऱ्या पिवळ्या कार्डला व पर्यायाने लाल कार्डला सामोरे जावे लागले आणि मैदान सोडावे लागले.

निकाल ।
केरळा ब्लास्टर्स एफसी : 2 (दिपेंद्र नेगी 48, इयन ह्युम 75-पेनल्टी)
विजयी विरुद्ध दिल्ली डायनॅमोज : 1 (कालू उचे 35-पेनल्टी)