बेंगलुरु बुल्स आणि तेलगू टायटन्सचा सामना बरोबरीत

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमामध्ये झालेल्या १९ व्या सामन्यात बेंगलुरु बुल्स आणि तेलगू टायटन्स आमने सामने होते. हा सामना २१-२१ असा बरोबरीत सुटला. या सामन्यात डिफेंडर आणि ऑलराऊंडर खेळाडूंनी चांगली कामगिरी केली ज्यामुळे खेळ डिफेन्सिव्ह झाला. बेंगलुरु बुल्ससाठी रोहितने सर्वाधिक ५ गुण मिळवले तर तेलुगू टायटन्ससाठी राहुल चौधरीने शेवटच्या काही मिनिटात उत्तम कामगिरी करत ८ गुण मिळवले.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध खेळ केला. सामन्यात १५ मिनिटे झाली तरी बेंगलुरु बुल्स ५ तर तेलुगु टायटन्स ७ गुण अश्या स्थित होते. बेंगलुरु बुल्सने दोन गुण मिळवत सामन्यात बरोबरी केली आणि त्यानंतर रेडसाठी आलेल्या राहुलला बाद करत शेवटच्या मिनिटात सामना ८-८ अश्या स्थितीत आणला. पण शेवटच्या रेडमध्ये बेंगलुरु बुल्सला गुण मिळाला आणि पहिले सत्र ९-८ असे संपले.

दुसऱ्या सत्रात बेंगलुरु बुल्सने आक्रमक खेळ केला. तेलुगूचे राकेश कुमार सह फक्त तीन खेळाडू मैदानात होते या तिघांना बाद करत बेंगलुरु बुल्सने तेलुगू टायटन्सला ऑल आऊट केले आणि सामन्यात १४-८ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात १२ मिनिटे झाली तेव्हा बेंगलुरु बुल्स १६-१२ असे आघाडीवर होते. १७ व्या मिनिटाला हरीश नाईकने यशस्वी रेड करत बेंगलुरु बुल्सची बढत १८-१५ अशी केली. त्यानंतर डू ऑर डाय रेडसाठी आलेल्या निलेशने गुण न मिळवता बोनसच्या भरवश्यावर परत गेला आणि पंचानी त्याला बाद ठरवले. रक्षितने बेंगलुरु बुल्सच्या दोन खेळाडूंना बाद करत सामना २०-१७ अश्या स्थितत आणला. त्यानंतर रेडसाठी आलेल्या रोहितला अतिआत्मविश्वास भोवला आणि तो बाद झाला.

शेवटच्या मिनिटाला सुरुवात झाली होती आणि रेडसाठी तेलुगू टायटन्सचा राहुल आला आणि त्याने दोन गुण मिळवत सामना २०-२० अश्या बरोबरीत आणला. त्यापुढील रेड बेंगलुरु बुल्सच्या आशिष सांगवानने केली त्यात एक बोनस गुण मिळवत बुल्स संघाला २१-२० अशी आघाडी मिळवून दिली पण सामन्याला केवळ १० सेकंद शिल्लक असताना रोहित रेडला आला आणि त्याने बेंगलुरु बुल्सच्या डिफेन्समध्ये उरलेल्या खेळाडू पैकी एकाला बाद केले आणि एक गुण मिळवला आणि तो आशिष सांगवानला बाद करायचा विसरला आणि धावत आपल्या मैदानात गेला आणि पंचानी सामना संपल्याचे घोषित केले. हा सामना २१-२१ असा बरोबरीत सुटला. शेवटच्या रेडमध्ये राहुलकडून चूक झाली, त्याने दोन्ही खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करायला हवा होता जो त्याने केला नाही आणि सामना बरोबरीत राहिला.

पण मागील ५ सामने सलग गमावलेल्या तेलुगू टायटन्सने हा सामना बरोबरीत सोडवला आणि ३ गुणांची कमाई केली.