आज प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा विरुद्ध तेलगू टायटन्स थरार !

प्रो कबड्डीमध्ये आज यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स हे दोन संघ भिडणार आहेत. मागील सामना जिंकल्यानंतर यु मुंबाच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तेलुगू टायटन्स हा संघ अजून आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. या स्पर्धेत ९ सामने खेळलेल्या या संघाने पहिला सामना जिंकला होता त्यानंतर मागील ८ सामन्यात ७ सात पराभव तर एक सामना बरोबरीत संघाने सोडवला आहे.

तेलुगू टायटन्स या संघासाठी फक्त राहुल चौधरी चांगली कामगिरी करत आहे. सांघिक कामगिरीचा अभाव असणाऱ्या या संघासाठी विजय हे न सुटणारे कोडे
बनले आहे. टायटन्सचा खेळ हा राहुल याच्या भोवती फिरतो आहे. जेव्हा राहुल मैदानाबाहेर असतो तेव्हा या संघाच्या गुण घेण्याच्या क्षमतेच्या मर्यादा स्पष्ट होतात. राकेश कुमारला या मोसमात आपली छाप पाडता आलेली नाही.

डिफेन्स या संघाची चिंतेची बाब ठरत आहे. हा संघ जरी रेडींगमध्ये गुण मिळवतो. पण डिफेन्समध्ये हा संघ गुण मिळवण्यात अपयशी ठरत आहे. राकेश कुमार या मोसमात आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. विशाल भारद्वाराज हा डिफेन्समध्ये चांगली कामगिरी करत आहे. बाकीच्या खेळाडूंकडून त्याला म्हणावी तशी साथ लाभत नाही.

यु मुंबाने कालच्या सामन्यात चांगला खेळ करत विजय मिळवला. या मोसमात यु मुंबाने ५ सामने खेळले आहेत. त्यातील ३ सामने हा संघ जिंकला आहे तर दोन सामन्यात यु मुंबाला पराभव सहन करावा लागला आहे. जे सामने यु मुंबाने गमावले आहेत त्यात या संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जे तीन सामने हा संघ जिंकला आहे त्यात खेळाच्या सर्व पातळ्यांवर यु मुंबाने उत्तम कामगिरी केली आहे.

मागील सामन्यात यु मुंबाच्या रेडर्सनी चांगली कामगिरी केली. विशेषतः शब्बीर बापूला गवसलेली लय यु मुंबासाठी जमेची बाजू आहे. काशीलिंग आडके याला मागील काही सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. सुरिंदर सिंग आणि कुलदीप यांची डिफेन्समध्ये जमलेली जोडी मुंबाचा उत्तम कामगिरी करत आहे.

टायटन्सकडे राकेश कुमार असला तरी राहुल वगळता अन्य कोणता खेळाडू यु मुंबाचा डोकेदुखी ठरेल असे वाटत नाही. या दोन्ही संघाचे सामने नेहमीच थरारक होतात. त्यामुळे आजचा सामना देखील थरारक होईल अशी अपेक्षा आहे.