अर्जुन पुढचा सचिन नाही तर अर्जुन म्हणूनच ओळखला गेला पाहिजे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरविषयी संवाद साधला आहे. तसेच त्याने अर्जुनची तुलना माझ्याशी करू नका तो अर्जुन म्हणूनच नाव कमावेल असे सांगितले आहे.

सचिन टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होता. सचिनला जेव्हा विचारले की अर्जुनची आणि त्याची होणारी तुलना यावर विचारले असता सचिनने सांगितले, “या गोष्टी होत राहतात पण अर्जुनाचे लक्ष फक्त खेळाकडे आणि त्याच्या जिद्दीकडे आहे. एक पालक म्हणून तुम्हाला हेच महत्वाचे असते. तुलना होत राहणार आहे. जर त्यांना कार्याचेच असेल तर ते करतील. पण मी माझ्या वडिलांकडून इतके शिकलो आहे की जे काम तुम्ही करणार आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. बाकी गोष्टी होत राहतात.”

अर्जुन हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि डाव्या हाताने फलंदाजी करतो. त्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये स्पिरिट ऑफ क्रिकेट चॅलेंज स्पर्धेत ब्रॅडमन ओव्हल ग्राउंडवर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी केली होती होती. त्याने हाँग काँग क्रिकेट क्लबविरुद्ध २७ चेंडूत ४८ धावा आणि ४ बळीही घेतले होते.

सचिनला जेव्हा अर्जुन हा पुढचा सचिन तेंडुलकर होऊ शकतो का असे विचारल्यावर तो म्हणाला, ” नाही, तो अर्जुनच व्हायला हवा. यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही.”

अर्जुन मुंबई संघाकडून वेगवेगळ्या वयोगटात क्रिकेट खेळला आहे. तसेच त्याने काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या १९ वर्षांखालील कूच बिहार ट्रॉफीतही चांगली कामगिरी केली आहे.