टेनिस व्हॉलिबॉल लवकरच ऑलिम्पिकमध्ये दिसेल : पेद्दावाड

टेनिस व्हॉलिबॉल या पुण्यात स्थापन झालेल्या खेळाचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून काही वर्षांमध्ये त्याला ऑलिम्पिक स्पर्धेची प्रवेशद्वारे खुली होतील असा विश्वास भारतीय टेनिस व्हॉलिबॉल महासंघाचे अध्यक्ष भगवान पेद्दावाड यांनी व्यक्त केला.

वरिष्ठ व मास्टर्स गटाच्या विसाव्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेस ज्येष्ठ उद्योजक शरद मोगले यांच्या हस्ते व क्रीडा संघटक सुदर्शन बालवडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या वेळी पेद्दावाड व भारतीय टेनिस व्हॉलिबॉल महासंघाचे संस्थापक डॉ.व्यंकटेश वांगवाड उपस्थित होते.

सी. एम. इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी-बाणेर) येथे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सोळा संघांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा पुरुष व महिला या दोन्ही विभागात होत आहे.

पेद्दावाड यांनी टेनिस व्हॉलबॉल खेळाच्या प्रगतीचा आढावा घेत सांगितले, या खेळाचा प्रसार आपल्या देशातही अनेक राज्यांमध्ये झाला आहे. खेळाडूंची संख्या व दर्जा वाढत चालला आहे. शासकीय सवलती मिळविण्यासाठी प्रत्येक राज्याच्या संघटनांनी लवकरात लवकर कागदोपत्रांची पूर्तता करावी.

वांगवाड म्हणाले, जुलै महिन्यात शिवछत्रपती क्रीडानगरी येथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये भाग घेण्यासाठी अनेक देशांनी उत्सुकता दाखविली आहे. ही स्पर्धा यशस्वी होईल व त्याचा फायदा जागतिक स्तरावर हा खेळ पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. या खेळाने आतापर्यंत फारशी शासकीय मदत न घेता आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल गाठली आहे.

मोगले यांनी सांगितले, खेळामुळेच जीवन निरोगी होण्यास मदत मिळते. तसेच खेळाद्वारे प्रत्येकाची सजग नागरिक म्हणून घडण होते. प्रत्येकाने दररोज किमान एक तास खेळासाठी दिला पाहिजे.

या समारंभास ज्येष्ठ क्रीडा संघटक शरदचंद्र धारुरकर हेही उपस्थित होते. मुकेश बाथम यांनी प्रास्ताविक केले. प्रा.गणेश माळवे यांनी आभार मानले.