Australian Open 2018: असे रंगणार पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने

मेलबर्न । अनेक दिग्गज खेळाडूंच्या पराभवानंतर आज ऑस्ट्रेलियन ओपन २०१८च्या उपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राफेल नदाल, रॉजर फेडरर, मारिन चिलीच, टोमास बर्डिच आणि ग्रिगोर दिमित्रोव्ह या मानांकित खेळाडूंसह कॅले एडमंड, ह्येन चुंग आणि तेँनीस सॅन्डग्रेन ह्या खेळाडूंना उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के करण्यात यश आले आहे.

उपांत्यपूर्व फेरी सामना १: राफेल नदाल विरुद्ध चिलीच
उपांत्यपूर्व फेरीत सर्वात लक्षवेधी लढत उद्या होणार असून अव्वल मानांकित राफेल नदाल आणि ६व्या मानांकित मारिन सिलीचमध्ये हा सामना होणार आहे. चिलीच यावर्षी पुणे शहरात झालेल्या महाराष्ट्र ओपन स्पर्धेत उपांत्यफेरीत पराभूत झाला होता तसेच २०१४च्या अमेरिकन ओपनचा तो विजेता आहे.

उपांत्यपूर्व फेरी सामना २: ग्रिगोर दिमित्रोव्ह विरुद्ध कॅले एडमंड
बेबी फेडरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रिगोर दिमित्रोव्हला या स्पर्धेत तिसरे मानांकन असून गेल्यावर्षी झालेल्या एटीपी फायनलचा तो विजेता आहे. २६ वर्षीय दिमित्रोव्हला कधीही उपांत्यफेरीच्या पुढे जाता आलेले नाही. त्याने २०१७मध्ये या स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली होती. त्याचा सामना बिगरमानांकीत कॅले एडमंड या खेळाडूशी होणार आहे. ११व्या मानांकित केविन अँडरसनला पराभूत करत त्याने आपले २०१८च्या ऑस्ट्रेलियन ओपनचे अभियान सुरु केले होते. परंतु पुढे तीन सामन्यात त्याला मानांकित खेळाडूचा सामना करावा लागला नाही.

उपांत्यपूर्व फेरी सामना ३: ह्येन चुंग विरुद्ध तेँनीस सॅन्डग्रेन
प्रत्येक ग्रँडस्लॅम स्पर्धेत एखादा खेळाडू असा असतो जो त्याच्या खेळामुळे सर्वांची मने जिंकतो. दक्षिण कोरियाचा ह्येन चुंग हा यावेळीचा तो खेळाडू ठरला आहे. त्याने १४व्या मानांकित नोवाक जोकोविच, ४थ्या मानांकित अलेक्झांडर झवेरवला, ३२व्या मानांकित मिशा झवेरवला यांना पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचा सामना तेँनीस सॅन्डग्रेन या बिगरमानांकीत खेळाडूंशी होणार आहे. तेँनीस सॅन्डग्रेनने डॉमिनिक थीम, स्टॅन वावरिंका या खेळाडूंचा पराभव केला आहे.

उपांत्यपूर्व फेरी सामना ४: रॉजर फेडरर विरुद्ध टोमास बर्डिच
गतविजेता रॉजर फेडररला पहिल्या ४ फेऱ्यात केवळ एका मानांकित खेळाडूचा सामना करावा लागला आहे. परंतु फेडरर प्रत्येक सामन्यात पूर्णपणे लयीत दिसला आहे. त्याने स्पर्धेत एकही सेट गमावला नाही. त्याच्याकडे या स्पर्धेचे संभाव्य विजेते म्हणून पहिले जाते. त्याचा सामना टोमास बर्डिचशी होणार असून बर्डिचला स्पर्धेत १९वे मानांकन आहे. हे दोन्ही खेळाडू २५वेळा समोरासमोर आले असून त्यात फेडररला १९ तर बर्डिचला ६वेळा विजय मिळवता आला आहे.