रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय

पल्लेकेल: आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने लंकेवर ३ विकेट्सने विजय मिळवला. यष्टीरक्षक एमएस धोनीच्या जबाबदार खेळीमुळे अतिशय अतीतटीच्या या सामन्यात भारतीय संघाने विजय अक्षरशः खेचून आणला.

१०९ धावांवर १ अशा सुस्थितीत असणाऱ्या भारतीय संघाला अकिला धनंजयाने आपल्या फिरकी गोलंदाजीवर अक्षरशः नाचवले. यातून एकवेळ भारताची अवस्था ७ बाद १३७ अशी झाली होती. रोहित शर्मा(५४) आणि शिखर धवन(४९) हे दोघे सोडून कोणताही खेळाडू मोती धावसंख्या उभारू शकला नाही. विराट कोहली(४) केदार जाधव(१) केएल राहुल(४), हार्दिक पंड्या (०) आणि अक्सर पटेल(६) हे फलंदाज एकेरी धावसंख्या करून तंबूत परतले.

त्यानंतर आलेल्या एमएस धोनीने भुवनेश्वर कुमारला हाताला धरून एकेरी दुहेरी धावांवर भर दिला. धोनीने अतिशय जबाबदार खेळी करत ६८ चेंडूत ४५ धावा केल्या. त्यात त्याने केवळ १ चौकार मारला. त्याला तेवढीच उत्तम साथ भुवनेश्वर कुमारने दिली. त्याने ८० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५३ धावा केल्या.

तत्पूर्वी श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ५० षटकांत ८ बाद २३६ धावा केल्या आहेत. परंतु इंनिंग ब्रेकनंतर पल्लेकेल येथे पाऊसाने हजेरी लावली. जर हा सामना डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारतापुढे ४७ षटकांत २३१ धावांचे लक्ष ठेवण्यात आले होते. भारताला हे लक्ष पार करण्यासाठी ४४.२ षटके लागली.

भारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत जसप्रीत बुमराहने ४, युझवेन्द्र चहलने २ तर अक्सर पटेल, केदार जादव आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. श्रीलंकेकडून मिलिंदा सिरीवर्दनाने सर्वोच्च ५८ तर चमारा कपुगेदराने ४० धावा केल्या.