आणि नेहराच्या वडिलांनी पहिल्यांदाच पाहिला आंतरराष्ट्रीय सामना

दिल्ली । भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नेहरा भारताकडून आजपर्यंत १७ कसोटी, १२० वनडे आणि २७ टी२० सामने खेळला.

परंतु आपण ऐकून आश्चर्यचकित व्हाल की नेहरच्या वडिलांनी पाहिलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. दिवाण सिंग असे नेहराच्या वडिलांचे नाव असून त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना पाहिले.

३८वर्षीय नेहराच्या शेवटच्या सामन्याला त्याचे कुटुंब उपस्थित होते.  यावेळी नेहराचे वडील दिवाण सिंग, आई सुमित्रा नेहरा, पत्नी रुषमा ,मुलगा आरुष नेहरा आणि मुलगी आरिआना नेहरा उपस्थित होते. कर्णधार विराट कोहली त्यांच्याशी बोलतानाही दिसला.

भारतीय संघाने न्यूझीलंड संघावर विजय मिळवल्यावर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी आशिष नेहराच्या आई वडिलांचे आशिर्वाद घेतले. नेहराचे वडील म्हणाले, ” सामना संपल्यावर विराट आणि शिखर यांनी आमची भेट घेतली तसेच आमचे आशीर्वादही घेतले. ते आशिषचे चांगले मित्र आहेत आणि अगदी लहानपणापासून घरी येत असतात. “