क्रीडा दिनानिमित्त पुण्यात सुरु होणार स्पोर्टस्‌ नर्सरी

पुणे । राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून पुण्यामध्ये स्पोर्टस्‌ नर्सरीला आज प्रारंभ करण्यात आला. या स्पोर्टस्‌ नर्सरीमुळे क्रीडा क्षेत्रात पहिले पाऊल टाकण्यापासून तर ते क्रीडा क्षेत्रात उच्च स्तरीय कामगिरी करण्यापर्यंत सर्वांना या नर्सरीमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे.

या स्पोर्टस्‌ नर्सरीचे उद्घाटन आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेती टेनिसपटू अंकिता रैना तसेच, ऑलंपिकपटू बॅडमिंटन प्रशिक्षक निखिल कानिटकर आणि ऑलंपिकपटू मुष्टियोध्दा मनोज पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे क्रीडा उपसंचालक नरेंद्र सोपल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्पोर्टस्‌ नर्सरीविषयी अधिक माहिती देताना स्पोर्टस्‌ नर्सरीचे मेंटॉर महेंद्र गोखले आणि सुंदर अय्यर यांनी सांगितले की, अशाप्रकारची ही पहिलीच स्पोर्टस्‌ नर्सरी असून याचे कार्य पीवायसी हिंदू जिमखाना आणि निगडी प्राधिकरण या ठिकाणी प्रामुख्याने सुरू होणार आहे. अशाप्रकारच्या 25स्पोर्टस्‌ नर्सरी या वर्षाअखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.

सुंदर अय्यर पुढे म्हणाले की, स्पोर्टस्‌ नर्सरीमध्ये चार वेगवेगळ्या पद्धतीने काम केले जाईल. यातील पहिल्या विभागात 4 वर्षांवरील मुलांसाठी त्यांची मोटरस्कील्स्‌, तसेच धावणे, उड्या मारणे आणि आयकॉर्डिनेशन(मेंदू डोळे व हात यांचा समन्वय)विकसित करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येईल. या स्पोर्टस्‌ नर्सरीमध्ये नावाप्रमाणेच 4वर्षे किंवा त्यावरील मुलांना क्रीडा प्रशिक्षण घेण्याची मुळ कल्पना आहे. आमच्या अभ्यासाप्रमाणे या वयोगटातील मुले मैदानावर कोणतेही लक्ष न ठेवता बराच काळ विनाकारण वाया घालवताना दिसून आले असल्याचे अय्यर यांनी सांगितले.

महेंद्र गोखले म्हणाले की, आम्ही एक अभ्यासक्रम तयार केला असून त्यानुसार सुरूवातीला धावणे, फेकणे, उड्या मारणे, झेलणे असे मुक्त क्रीडा प्रकार देण्यात येणार असून मुले जसजशी मोठे होतील तसेतशी त्यांना फुटवर्क, कॅलिस्ट्रेनिक्स किंवा चपळतेसाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम देण्यात येणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत मुलांना त्यांच्या विकासाच्या वयात योग्य क्रीडा प्रकाराची निवड करता येत नाही आणि या नकारात्मक अनुभवामुळे ही मुले नाऊमेद होऊन क्रीडा क्षेत्राकडे पाठ फिरविण्याची शक्यता असते. म्हणून 7व्या वर्षी मुलांना एक रिपोर्ट कार्ड देणार असून त्यामध्ये मुलांच्या शारिरीक क्षमतेनुसार त्याने कोणता खेळ स्विकारावा यासंबंधी अचूक विश्लेषण केलेले असणार आहे. आमच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा मुलगा 7व्या वर्षी क्रीडा क्षेत्रात प्रवेश करताना अन्य खेळाडूंच्या तुलनेत खुपच पुढे असेल.

त्याचीच पुढील पायरी म्हणून स्पोर्टस्‌ नर्सरी त्यातील तज्ञांनी विकसित केलेल्या विश्लेषण प्रक्रियेनुसार मुलासंबंधी विशिष्ट माहिती गोळा करणार आहे. त्यामध्ये हेल्थ रिस्क ऍप्रायझल किंवा मुव्हमेंट स्क्रीन्स आणि परफॉर्मन्स टेस्ट यांचा समावेश आहे.

जगातील क्रीडा महासत्ता असलेल्या देशांनी याआधीच जागतिक दर्जाच्या ऍथलिटस्‌साठी आवश्यक असलेल्या शारिरीक क्षमतेचे निकष निश्चित केले आहेत आणि हे निकष विविध देशांमधील हवामान आणि भौगोलिक परिस्थितींवर निश्चित होत असतात. हे सर्व निकष खेळाडूंमधील गुणवत्ता शोधून त्यांचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. याच धर्तीवर स्पोर्टस्‌ नर्सरीत सहभागी होणार्‍या सर्व क्रीडाप्रकारांमधील ऍथलीटस्‌ना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे महेंद्र गोखले यांनी सांगितले.

दुसर्‍या विभागात खेळाडूंचे उद्दिष्ट, गरजा व क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार खेळाडूंच्या क्षमतेची विश्लेषण करण्याची प्रक्रिया राबविली जाईल. (उदा.हेल्थ रिस्क ऍप्रायझल किंवा परफॉर्मन्स टेस्ट).

जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील महासत्तांना आव्हान देण्यात भारताला येत असलेले अपयश हे शास्त्रशुद्ध शारिरीक शिक्षण आणि डाटा ऍनालिसिस अशा गोष्टींच्या अभावामुळे निर्माण झालेली समस्या आहे. 19 ते 23 वयोगटातील 50टक्कयांहून अधिक भारतीय खेळाडू स्पोर्टस्‌मुळे येणार्‍या दुखापतीमुळे मागे राहतात. शारिरीक तंदरूस्ती व क्षमतेच्या विकासाऐवजी केवळ कौशल्याकडे लक्ष दिल्यामुळे या अडचणी येत असल्याचे गोखले यांनी निदर्शनास आणले.

शारिरीक क्षमतेच्या चाचणीमध्ये खेळाडूच्या स्नायू व हाडांच्या रचनेबरोबरच वेगाने हालचाल करण्याची क्षमता व तंदरूस्ती याच्या परिक्षणाचा समावेश आहे. हे सर्व परिक्षण शाळांमध्ये, स्पोर्टस्‌ अकादमीमध्ये किंवा महाविद्यालयात स्पोर्टस्‌ नर्सरीच्या तंज्ञांकडून केले जाणार असल्याचे त्यांनी नमुद केले.

तिसर्‍या विभागात उद्योन्मुख गुणवान खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी बजावण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, तसेच त्यासाठी खेळाडूंची बलस्थाने व कच्चे दुवे शोधून सुधारणा घडवून आणण्याकडे लक्ष दिले जाईल. याच विभागात खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष पुरविले जाईल.

चौथ्या विभागात क्रीडा क्षेत्रात करीअर करू इच्छिणार्‍या खेळाडूंना विद्यमान किंवा माजी खेळाडू यांच्याकडून मार्गदर्शन केले जाईल. तसेच यावेळी अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षकांनादेखील मार्गदर्शन केले जाईल. हा संपूर्ण कार्यक्रम ऑस्ट्रेलियन स्ट्रेन्थ ऑड कंडिशीनिंग असोसिएशन तर्फे प्रमाणित केला जाणार आहे.

शारिरीक विश्लेषणामध्ये स्नायू व हाडांच्या रचनेबरोबरच वेगाने हालचाल करण्याची क्षमता तसेच, शारिरीक क्षमता व तंदरूस्तीसाठी विविध निकषांचा समावेश आहे. स्पोर्टस्‌ नर्सरीने नियुक्त केलेल्या तज्ञांव्दारे शाळा किंवा स्पोर्टस्‌ अकादमीमध्ये हे विश्लेषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

मनिष पांडेचा पुन्हा एकदा धमाका, एशिया कपमध्ये टीम इंडियात जागा पक्की!

– …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

-भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…