राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी आज संभाव्य २१ खेळाडूंमधून १५ जणांच्या महाराष्ट्राच्या संघाची आज घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथे होणार आहे.

या संघाचे नेतृत्व मुंबईच्या रिशांक देवाडिगाकडे सोपवण्यात आले असून प्रो कबड्डीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मोठ्या नावांना संघात स्थान देण्यात आले आहे.

या स्पर्धेत एकूण ३१ संघ सहभागी होणार असून ६ दिवस ही स्पर्धा हैद्राबाद येथील गाचीबोवली इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.

काशिलिंग आडकेचे संभाव्य खेळाडूंमध्येही नाव नव्हते आणि आता अंतिम संघातही त्याला स्थान नाकारण्यात आले आहे. संघाचे सराव शिबीर पार पडल्यांनंतर आज या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

संभाव्य संघात स्थान मिळालेल्या विशाल मानेलाही १५ खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आले नाही.

या संघात पुण्याच्या ४ खेळाडूंना जागा मिळवण्यात यश आले आहे. प्रो कबड्डीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अक्षय जाधवला मात्र राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.

असा असेल संघ:
रिशांक देवाडिगा (कर्णधार, मुंबई उपनगर), विकास काळे (पुणे), सचिन शिंगाडे(सांगली), गिरीश इर्नाक(ठाणे), विराज लांडगे(पुणे), नितीन मदने(सांगली), तुषार पाटील (कोल्हापूर), निलेश साळुंखे(ठाणे), ऋतुराज कोरवी(कोल्हापूर), सिद्धार्थ देसाई(पुणे), अजिंक्य कापरे(मुंबई शहर), रवी ढगे (जालना)

राखीव खेळाडू: अक्षय जाधव(पुणे), उमेश म्हात्रे(ठाणे), महेंद्र राजपूत(धुळे)