संपूर्ण यादी: वाचा भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना काय काय बक्षिस मिळणार?

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारलेला भारतीय महिला क्रिकेट संघ परवाच भारतात परतला. मुंबई विमानतळावर या संघाचे जोरदार स्वागतही झाले. विविध राज्य सरकारे पुढे येऊन या खेळाडूंसाठी मोठ मोठी बक्षिसे घोषित करत आहेत.

महिला संघाच्या कधी नाही ते एवढे कौतुक वाट्याला येत आहे. विश्वचषक होऊन आता ६-७ दिवस उलटूनही आजही या संघातील खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा आहे. रोज कुणीतरी बक्षिसांची घोषणाही करत आहे. हा मधल्या काळात घोषित झालेल्या बक्षिसांचा हा संपूर्ण लेखाजोखा…

१. सर्वप्रथम भारतीय क्रिकेट बोर्डाने अंतिम सामना सुरु होण्याआधीच भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूसाठी ५० लाख रुपये बक्षीस म्हणून घोषित केले. तर संघातील स्टाफसाठी २५ लाख रुपये प्रत्येकी घोषित करण्यात आले.

२. भारतीय रेल्वेमध्ये असणाऱ्या दहा भारतीय महिला क्रिकेटपटूंना प्रत्येकी १३ लाख रुपये देण्याची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. तसेच मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या पदोन्नती देऊन आता त्यांना गॅझेटेड ऑफिसर ह्या पदावर नियुक्त केले आहे. अन्य ८ खेळाडूंमध्ये एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, पूनम राऊत, वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, सुषमा वर्मा मोना मेश्राम आणि नुझात परवीन यांचा समावेश असून त्यांना प्रत्येकी १३ लाख रुपये मिळणार आहेत.

३. विश्वचषक अंतिम फेरीत खेळलेल्या भारतीय संघातील पूनम राऊत, स्मृती मानधना, मोना मेश्राम या महाराष्ट्राच्या तीन कन्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

४. सध्या एअर इंडियामध्ये कार्यरत असणाऱ्या अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला डेप्युटी मॅनेजर या पदावर नियुक्त करून पदोन्नती दिली आहे.

५.भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे. मिताली राज हैदराबादला परतली असता तिला ही आलिशान कार भेट देण्यात येईल. ज्युनिअर क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि तेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष चामुंडेश्वरनाथ यांनी मितालीला बीएमडब्ल्यू कार देण्याची घोषणा केली आहे.

६.आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाला विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम पेरीत पोहोचविणारी आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौरला पंजाब पोलीस दलात जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची ऑफर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली आहे. तसेच हरमनप्रीतला त्यांनी पाच लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले आहे.

७. हिमाचल प्रदेश सरकारने सुषमा वर्मा हिला पोलिस दलात पोलिस उप-अधिक्षक पदाची नोकरी जाहीर केली आहे. भारताला अंतिम फेरीत पोहचवण्यात भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडलेल्या सुषमाने महत्वाची कामगिरी बजावली होती.