आयसीसी २०१७ चे सर्वोत्तम महिला वनडे, टी २० संघ जाहीर, तीन भारतीय महिला क्रिकेटपटूंची निवड

आज आयसीसीने या वर्षाच्या महिलांच्या सर्वोत्तम वनडे आणि टी २० संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात मिळून तीन भारतीय महिला खेळाडूंची निवड झाली आहे.

भारताची ३१ वर्षीय फिरकी गोलंदाज एकता बिश्तची आयसीसीने वनडे आणि टी २० अशा दोन्ही संघात समावेश केला आहे. या दोन्ही संघात समावेश असणारी ती एकमेव खेळाडू आहे. तसेच भारताची कर्णधार मिताली राजची वनडेत आणि हरमनप्रीत कौरची टी २० संघात निवड झाली आहे.

या संघनिवडीसाठी आयसीसीच्या पॅनलने २१ सप्टेंबर २०१६ पासूनची कामगिरी लक्षात घेतली आहे.

आयसीसीच्या दोन्ही संघात निवड झालेल्या एकतासाठी हा मोठा सन्मान आहे . तिने भारताकडून २१ सप्टेंबर २०१६ पासून १९ वनडे सामन्यात ३४ बळी घेतले आहेत तसेच ७ टी २० सामन्यात ११ बळी घेतले आहेत. सध्या ती वनडे क्रमवारीत १४ व्या आणि टी २० क्रमवारीत १२ व्या स्थानी आहे.

भारताची फलंदाज मिताली वनडेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने वनडेत आजपर्यंत १८६ सामन्यात ५१.५८ च्या सरासरीने ६१९० धावा केल्या आहेत. तर हरमनप्रीतने यावर्षी पार पडलेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक शतकी खेळी केली होती तिच्या त्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती.

आयसीसीच्या या वनडे संघाचे नेतृत्व इंग्लंडच्या हिदर नाईटकडे तर टी २०चे विंडीजच्या स्टीफनी टेलरकडे सोपवण्यात आले आहे. भारताबरोबरच या दोन्ही संघात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचाही समावेश आहे.

हे संघ निवडण्यासाठी आयसीसीचे एक पॅनल होते ज्यांनी यावर्षीच्या वयक्तिक सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कारांसाठीही मते दिली होती. या पॅनेलमध्ये क्लो सॉल्टू, मेल जोन्स, लिसा स्थळेकर (ऑस्ट्रेलिया); शार्लोट एडवर्ड्स, कालिका मेहता, अॅलिसन मिशेल, अॅलन विल्किन्स (इंग्लंड आणि वेल्स); अंजुम चोप्रा, स्नेहल प्रधान (भारत); ऑलिव्हिया कॅल्डवेल(न्यूझीलंड); फिरदोस मुन्डा, नताली जर्मनोस(दक्षिण आफ्रिका); एस थॉफिक( श्रीलंका),इयान बिशप, फाझीर मोहोम्मद( विंडीज) यांचा समावेश होता.

आयसीसीचा सर्वोत्तम वनडे संघ २०१७:
टॅमी बोमोंट(इंग्लंड),मेग लाँनिंग (ऑस्ट्रेलिया),मिताली राज(भारत),एमी सॅटर्थवेट(न्यूझीलंड),एलिस पेरी(ऑस्ट्रेलिया),हिदर नाईट(कर्णधार) (इंग्लंड), साराह टेलर(यष्टीरक्षक)(इंग्लंड), डॅन वॅन निकर्क(दक्षिण आफ्रिका),मॅरिझन कॅप(दक्षिण आफ्रिका), एकता बिश्त(भारत), अॅलेक्स हार्टली(इंग्लंड).

आयसीसीचा सार्वोत्तम टी २० संघ २०१७:
बेथ मुनी(यष्टीरक्षक) (ऑस्ट्रेलिया), डॅनी वॅट(इंग्लंड),हरमनप्रीत कौर(भारत), स्टीफनी टेलर(कर्णधार)(विंडीज),सोफी डिवाईन(न्यूझीलंड), डीएन्द्रा डॉटीन(विंडीज),हॅली मॅथ्यूज(विंडीज), मेगन शट(ऑस्ट्रेलिया),आमंडा-जॅड वेलिंग्टन(ऑस्ट्रेलिया), ली ताहुहू(न्यूझीलंड),एकता बिश्त(भारत).