एशियन गेम्स: इराण कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये पुरुष कबड्डीच्या अंतिम फेरीत इराणने दक्षिण कोरियाचा 26-16 अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे.

या सामन्यात पहिल्या सत्रात एकेका पॉइंटसाठी दोन्ही संघांकडून संघर्ष पहायला मिळाला. पण नंतर इराणने पहिल्या सत्रात 10-8 अशी 2 पॉइंटची आघाडी घेतली.

मात्र दुसऱ्या सत्रात इराणने पूर्ण वर्चस्व ठेवले. त्यांच्या बचावफळीने कोरीयाच्या रेडर्सला सहज पॉइंट मिळवण्यापासून रोखले होते. बचावफळी प्रमाणेच इराणच्या रेडर्सने उत्तम कामगिरी करताना सातत्याने पॉइंट्स मिळवले.

बचावात इराणकडून फजल अत्राचली आणि अबोझर मोहाजेरमिघानीने तर रेडींगमध्ये इस्माईल माघसौदलौ, मोहम्मद इस्माईल नबीबक्ष यांनी चांगली कामगिरी केली. तसेच इराणच्या संघाकडून चांगला अष्टपैलू खेळ करण्यात आला.

एशियन गेम्स 2018 मध्ये कबड्डीत इराणच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी वर्चस्व राखताना सुवर्णपदक मिळवले आहे.

पुरुषांच्या अंतिम फेरीआधी महिलांचा अंतिम सामना पार पडला होता. ज्यात इराणच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा 24-27 अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या महिला संघाला रौप्यपदक मिळाले.

त्याचबरोबर इराणच्या दोन्ही संघांनी या स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघाचा पराभव करत एशियन गेम्समधील भारताचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे.

बुधवारी इराणच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत 7 वेळच्या सुवर्णपदक विजेत्या भारताचा पराभव केला. त्यामुळे यावर्षी भारतीय पुरुष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

विशेष म्हणजे साखळी फेरीत दक्षिण कोरियाच्या संघानेही भारतीय पुरुष संघाचा पराभव केला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक

एशियन गेम्स: भारताला कबड्डीत पराभूत करत इराणच्या महिलांनी रचला इतिहास

एशियन गेम्स: हिना सिद्धूला नेमबाजीत कांस्यपदक