या १० दिग्गज क्रिकेटपटूंना आजपर्यंत मिळवता आले नाही विश्वचषकाचे विजेतेपद

12 व्या वनडे क्रिकेट विश्वचषकाला येत्या गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच या विश्वचषकाची उत्सुकता लागली आहे. अनेकांनी यावर्षी विश्वचषक विजयाचे प्रबळ दावेदार कोण याचे अंदाजही व्यक्त केले.

मात्र आजपर्यंत क्रिकेट जगतात असे अनेक क्रिकेटपटू झाले ज्यांना महानतेची उपाधी तर मिळाली पण त्यांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र पूर्ण झाले नाही.

असे हे 10 खेळाडू, ज्यांना विश्वचषक जिंकता आलेला नाही – 

10. लान्स क्लुसेनर – दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू असणारा लान्स क्लुसेनरने 1999 च्या विश्वचषकात धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने या विश्वचषकात जवळजवळ दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पोहचवले होते.

मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या नाट्यपूर्ण उपांत्य सामन्यात शेवटच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेचे हे स्वप्न भंगले. हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सुपर सिक्सच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने त्यांना अंतिम सामन्याचे तिकीट मिळाले.

या सामन्यात क्लुसेनरने 16 चेंडूत नाबाद 31 धावांची आक्रमक खेळी केली होती. तसेच फक्त या सामन्यातच नाही तर या विश्वचषकात त्याने 140 च्या स्ट्राईक रेटने 9 सामन्यात 281 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्याने 17 विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

9. जॅक कॅलिस – दक्षिण आफ्रिकेचाच अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने क्रिकेट जगतात मोठे नाव मिळवले. त्याने अनेकदा कसोटी आणि वनडेमध्ये केलेल्या शानदार अष्टपैलू कामगिरीने सर्वांची वाहवा मिळवली. त्याने वनडेमध्ये 273 विकेट्स आणि 11,000 पेक्षाही अधिक धावा केल्या. मात्र तरीही त्याचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले.

कॅलिसने त्याच्या कारकिर्दीत 1996,1999,2003,2007 आणि 2011 असे 5 विश्वचषक खेळले. यामध्ये त्याने 36 सामन्यात 45.92 च्या सरासरीने 1148 धावाही केल्या. याबरोबरच 21 विकेट्सही घेतल्या आहेत.

8. कुमार संगकारा –  श्रीलंकेचा दिग्गज कर्णधार कुमार संगकाराने त्याच्या यष्टीरक्षणाच्या आणि फलंदाजीच्या शानदार कामगिरीने क्रिकेटजगतात दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळवले. मात्र त्यालाही त्याच्या कारकिर्दीत विश्वचषक जिंकता आला नाही.

संगकारा श्रीलंकेकडून 2007 आणि 2011 असे दोन सलग विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला. मात्र दोन्ही अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याला विश्वचषकाची ट्रॉफी उंचावता आली नाही.

संगकाराने 2015 च्या विश्वचषकानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

7. शाहिद अफ्रिदी – पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात 37 चेंडूत शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते.

त्याने त्याच्या कारकिर्दीत पाकिस्तानकडून 398 वनडे सामने खेळले. यात त्याने 8064 धावा केल्या आणि 395 विकेट्सही घेतल्या. पण त्यालाही त्याच्या कारकिर्दीत विश्वचषकाची ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली नाही.

पाकिस्तानने 2011 विश्वचषकात अफ्रिदीच्या नेतृत्वाखाली उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली होती. परंतू त्यावेळी पाकिस्तान संघाला भारताकडून पराभव स्विकारावा लागला होता.

अफ्रिदीने त्याच्या कारकिर्दीत 5 विश्वचषक खेळले. यात त्याने 27 सामन्यात 325 धावा केल्या आणि 30 विकेट्स घेतल्या.

6. ब्रायन लारा – विंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांची फलंदाजी क्रिकेट चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहिल. त्यांचा कसोटीमधील सर्वोच्च धावांचा विक्रम आजही अबाधित आहे. पण या दिग्गज क्रिकेटपटूला वनडे क्रिकेटमधील विश्वचषक मात्र जिंकता आला नाही.

त्यांनी विंडिजकडून 299 वनडे सामने खेळले. यात त्यांनी 40.48 च्या सरासरीने 10405 धावा केल्या. यात त्यांनी 19 शतके 63 अर्धशतके केली आहेत.

याबरोबरच आत्तापर्यंत विश्वचषकात विंडिजकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही लारा यांच्या नावावर आहे. त्यांनी 5 विश्वचषक खेळताना 34 सामन्यात 42.24 च्या सरासरीने 1225 धावा केल्या आहेत.

5. ग्रॅहम गुच – इंग्लंडचे महान क्रिकेटपटू ग्रॅहम गुच यांनी तब्बल तीन वेळा विश्वचषकाचे अंतिम सामने खेळले. तसेच 1992 च्या विश्वचषकात त्यांच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडने अंतिम सामन्यातही धडक मारली होती.

मात्र प्रत्येक वेळी इंग्लंडला अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे गुच यांचे विश्वचषक विजयाचे स्वप्नही पूर्ण झाले नाही.

त्यांनी इंग्लंडकडून 125 वनडे सामने खेळले. यात त्यांनी 4290 धावा केल्या. तसेच 36 विकेट्सही घेतल्या.

4. इयान बॉथम – इंग्लंडचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बॉथम यांनी दोन वेळा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला. मात्र इंग्लंडला अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागल्याने त्यांना विश्वचषक विजेतेपदाची ट्रॉफी उचलण्याचे भाग्य लाभले नाही.

त्यांनी 1992 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. त्यांनी या विश्वचषकात 10 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या. तसेच 192 धावाही केल्या होत्या.

3. वकार युनुस – पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वकार युनुसने त्याच्या गोलंदाजीने अनेक फलंदाजांना त्रास दिला. मात्र तो 1992 च्या विश्वचषकावेळी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला या विश्वचषकात सहभागी होता आले नाही.

विशेष म्हणजे याच विश्वचषकात पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्वाखाली विजेतेपदही मिळवले. मात्र युनुस या संघात सहभागी नसल्याने त्याचे विश्वचषक विजेतेपद मिळवण्याचे स्वप्नही अपूर्ण राहिले.

त्याने पाकिस्तानकडून 262 वनडे सामने खेळले. यात त्याने तब्बल 416 विकेट्स घेतल्या.

2. सौरव गांगुली – भारताचा महान फलंदाज सौरव गांगुलीलाही 2003 मध्ये विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्याची संधी होती. मात्र भारताला या विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्यावेळी कर्णधार असलेल्या गांगुलीला विश्वचषक विजेतेपदाची ट्रॉफी मात्र उचलता आली नाही.

गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत तीन विश्वचषक खेळले. 1999, 2003 आणि 2007 या तीन विश्वचषकात मिळून त्याने 21 सामन्यात 55.88 च्या सरासरीने 1006 धावाही केल्या. तसेच तो विश्वचषकात 1000 पेक्षा अधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर नंतरचा केवळ दुसराच भारतीय क्रिकेटपटू आहे.

1. एबी डिविलियर्स – दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज आक्रमक फलंदाज एबी डिविलियर्सने 2019 चा विश्वचषक सुरु होण्यासाठी केवळ 1 वर्षांचा कालावधी बाकी असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली.

त्यामुळे तो 2019 चा विश्वचषक खेळणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले. पण त्याचबरोबर या खेळाडूचे आता विश्वचषक विजेतेपद मिळवण्याचे स्वप्नही अधूरे राहणार हे देखील निश्चित झाले.

त्याने वनडे क्रिकेटमध्ये अनेक अविस्मरणीय खेळी आजपर्यंत केल्या आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचाही विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने विश्वचषकात त्याच्या कारकिर्दीत 23 सामने खेळले. यात त्याने 63.52च्या सरासरीने 1207 धावा केल्या आहेत.

तसेच 2015 च्या विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने उपांत्य़ फेरीतही धडक मारली होती. मात्र त्यांना न्यूझीलंड विरुद्ध पराभवाचा धक्का मिळला. हा विश्वचषक डिविलियर्सचा शेवटचा विश्वचषक ठरला.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकात खेळणाऱ्या स्मिथ-वाॅर्नर जोडीबद्दल फिंचने केले मोठे वक्तव्य

विश्वचषक होतोय त्या देशात शतकी खेळी केल्यावर रहाणे म्हणाला…

मिस्टर ३६० एबी डीव्हिलीयर्सचे ते स्वप्न आजही आहे अधुरे