मोसमातील सर्वात रोमांचकारी अश्‍वशर्यतीसाठी पुणेकर सज्ज

पुणे। मोसमातील सर्वांत रोमांचकारी अश्‍वशर्यत असलेल्या द सदर्न कमांड गोल्ड ट्रॉफीसाठी पुणे सज्ज झाले आहे. द रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब मध्ये आयोजित या अश्वशर्यतीसोबत सदर्न कमांडच्या जवानांनी सादर केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि इतरही अनेक असे आकर्षक कार्यक्रम रेस शौकिकांना पाहायला मिळणार आहे.

द सदर्न कमांड गोल्ड ट्रॉफी ही अश्वशर्यत 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार असून या शर्यतीसाठी पुणेकर शौकिनांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे. एकेकाळी द सदर्न कमांड कप या नावाने प्रसिद्ध असलेली ही शर्यत 1948 पासून सुरु आहे. स्प्रिंटसाठी प्रसिद्ध असलेल्या या शर्यतीत 3 वर्षे वयाचे आणि अत्यंत व्यावसायिकरित्या प्रशिक्षित केलेले घोडे धावत असतात.

मोसमातील अत्यंत प्रतिष्ठेच्या या अश्वशर्यतीसाठी पुण्यातील रेस शौकीन उपस्थित राहतीलच, शिवाय पुणे येथील संरक्षण दलातील सेना दलाचे मान्यवर व्यक्तीही सहभागी होत असतात. या शर्यतीच्या विजेत्याला जनरल ऑफिसर इन चीफ सदर्न कमांड यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येते.