म्हणून आज भारताकडून पदार्पण केलेल्या त्या खेळाडूचे नाव आहे वॉशिंग्टन !

मोहाली।येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडेत वॉशिंग्टन सुंदरने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. मात्र सर्वांना त्याच्या वॉशिंग्टन या नावाचे आश्चर्य वाटत आहे. त्याच्या वॉशिंग्टन नावा मागचा इतिहास त्याच्या वडिलांनी सांगितला आहे.

ते द हिंदूला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले ” मी हिंदू आहे आणि मी एका चांगल्या कुटुंबातून आलो आहे. माझ्या घरापासून दोन रस्ते सोडून ट्रीपलिकेनमध्ये एक माजी सैनिक राहत होते. त्यांचे नाव पीडी वॉशिंग्टन असे होते. त्यांना क्रिकेट फार आवडायचे. ते आम्हाला खेळताना बघण्यासाठी मरिना मैदानावर यायचे. त्यांना माझा खेळ आवडायचा.”ते पुढे म्हणाले ” मी गरीब होतो. ते मला गणवेश घेऊन द्यायचे, माझी शाळेची फी भरायचे, मला पुस्तके घेऊन द्यायचे, त्यांच्या सायकलवर मला मैदानावर घेऊन जायचे, तसेच मला प्रेरणा द्यायचे.”
वॉशिंग्टन सुंदरचे वडीलही क्रिकेटपटू होते. त्यांच्यासाठी माजी सैनिक वॉशिंग्टन सर्व काही होते.

त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव वॉशिंग्टन ठेवल्याचे सांगताना म्हणाले, ” माझ्या पत्नीला मुलाच्या जन्माच्या वेळी खूप त्रास झाला होता पण बाळ बचावले. हिंदू रीतीप्रमाणे मी देवाचा धावा केला होता. मी माझ्या मुलाचे नाव श्रीनिवासन ठेवले होते. पण नंतर मी त्याचे नाव वॉशिंग्टन ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्या व्यक्तीने माझ्यासाठी इतके काही केले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी हे नाव ठेवले.”

वॉशिंग्टन सुंदर याआधी तामिळनाडूकडून रणजी ट्रॉफीत खेळला आहे. तिथेही त्याने चांगली कामगिरी केली होती. तसेच तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघातूनही खेळला आहे.