दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानासाठी आम्ही तयार आहोत- विराट कोहली

भारतीय संघचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्यातील आव्हानासाठी भारतीय संघ तयार आहे असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी, वनडे आणि टी २० मालिका खेळणार आहे.

भारतीय संघाविषयीचा विश्वास व्यक्त करताना विराट म्हणाला, ” आम्ही दक्षिण आफ्रिकेला येताना हाच विचार करून आलो होतो की इथे भारतापेक्षा वेगळ्या खेळपट्या मिळतील. आम्हाला इथे जे मिळणार आहे त्यासाठी आम्ही तयार आहोत. आमच्या समोर जे काही येणार आहे त्याबद्दल आमचे कसलेही भ्रम नाहीत. ५ जानेवारीसाठी आम्ही तयार आहोत.”

” मला असे वाटते की ज्या प्रकारचे आमचे गोलंदाजी आक्रमण आहे आणि जो फलंदाजीचा अनुभव आहे त्या जोरावर आम्ही इथे नक्की जिंकू शकतो. याविषयी दुमत नाही. जर आमची तशी मानसिकता नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही.”

५ जानेवारी पासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही कसोटी मालिका ३ सामन्यांची होणार आहे.

विराट पुढे म्हणाला, ” आम्हाला इथे येऊन स्वतःला सिद्ध करायचे आहे. आमचा आमच्या क्षमतेवर विश्वास आहे आणि आम्हाला माहित आहे की आमच्याकडे कसोटी सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी लागणारा समतोल आहे. चांगले क्रिकेट खेळण्यासाठी आमच्याकडे ही चांगली संधी आहे.”

तसेच इतिहासाचा विचार करणार नसल्याचे सांगताना विराट म्हणाला, ” आम्ही दक्षिण आफ्रिकेत खेळत आहोत की दुसऱ्या कोणत्या देशात याचा विचार करत नाही. आमच्यासाठी सामन्यातील सत्र जिंकणे, वर्तमानात राहणे आणि स्वतःला योग्य सिद्ध करणे महत्वाचे असेल. आम्ही इतिहासाचा विचार करत नाही.”

विराट पुढे म्हणाला ” भारतीय संघ या आव्हानासाठी तयार आहे.”

भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्याआधी दोन दिवसाच्या सराव शिबिरात भाग घेणार होता.