येत्या शनिवारी व रविवारी पुणे मॉन्सून अश्वशर्यतींचा थरार

पुणे। येत्या शनिवारी व रविवारी (3 व 4 ऑगस्ट रोजी ) रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी) येथे अश्वशर्यतींच्या यंदाच्या मोसमातील दोन अत्यंत थरारक शर्यती रंगणार आहेत.

द ऑगस्ट हँडीकप ही त्यातील पहिली शर्यत शनिवारी, 3 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे.1966 पासून सुरू झालेली ही शर्यत तीन वर्षे वयाच्या अश्वांसाठी आहे. यातील प्रत्येक अश्वाला विजयासाठी 1400 मीटर धाव घ्यावी लागणार असून अश्वशर्यतींच्या इतिहासामध्ये या शर्यतीला महत्त्वाचे स्थान आहे.

रेस शौकिनांना प्रतीक्षा असलेली टर्फ क्लब ट्रॉफी ही आणखी एक महत्वाची शर्यत रविवार, 4 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे. या शर्यतीला मोठा इतिहास असून ही शर्यत मुंबई रेसकोर्सवर टर्फ क्लब कप या नावाने 1947 पासून सुरू झाली. 1987 मध्ये ग्रेडेड रेस स्टेटस मिळाल्यानंतर 1400 मीटरची ही शर्यत महत्त्वाची मानली जाते.