प्रो कबड्डी: या वर्षी हे खेळाडू ठरू शकतात टॉप- ५ रेडर

क्रिकेटमध्ये फलंदाजाला, फुटबॉलमध्ये स्ट्रायकरला जितके महत्त्व असते तितकेच महत्त्व आणि कबड्डीमध्ये रेडरला असते. क्रिकेटमध्ये जस कौतुक फलंदाजाच्या वाट्याला येते तसेच कबड्डीमध्ये रेडर भाव खाऊन जात असतात. कारण सामना जिंकायचा तर आपल्या संघाचे गुण विरोधी संघापेक्षा जास्त असायला हवेत. डिफेन्समध्ये गुण मिळवणे तसे अवघड असते त्या तुलनेत रेडींगमध्ये गुण मिळवणे जास्त सोपे असते. तसेही म्हणतात ना ,”अपने घर मे तो सभी शेर होते है.” कौतुक असते ते विरोधी संघाच्या जागेत घुसून गुण मिळवण्याचे.

तर आपण पाहूया प्रो कबड्डी ५ मोसमात विरोधी खेळाडूंच्या मनात धडकी भरवू शकणारे काही रेडर…

#१ राहुल चौधरी:
प्रो कबड्डीचा ‘पोस्टर बॉय ‘तेलगू टायटन्सचे फॅन आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा खेळाडू म्हणजे राहुल चौधरी. प्रो कबड्डीच्या इतिहासात ५०० गुण मिळवणारा पहिला आणि एकमेव खेळाडू. प्रो कबड्डीमध्ये राहुल चौधरी हे नाव विरोधी संघाची झोप उडवायला खूप आहे. २ वेळेसचा स्पर्धेतील सर्वोत्तम रेडर ठरलेल्या राहुलने प्रो कबड्डीमध्ये खेळताना ५७ सामन्यात ५१७ गुण मिळवले असून त्यातील ४८२ गुण रेडींगमध्ये तर ३५ गुण त्याने डिफेन्समध्ये कमावले आहेत.

#२ अनुप कुमार:
भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार. कबड्डीमधील सध्याचा सर्वात चर्चित खेळाडू आणि ज्याने आपल्या यु मुंबा संघाला सलग ३ वेळा प्रो कबड्डीच्या अंतिम सामान्यापर्यंत नेले आणि दुसऱ्या मोसमाचे विजेतेपद मिळवून दिले असा हा खेळाडू. सामन्यात शेवटच्या काही मिनिटात सामना आपल्या बाजूने वळवण्याचे अजब कसब अवगत असणारा हा असामान्य खेळाडू. आपल्या ‘टो टच’ आणि ‘बोनस’ करण्याच्या कौशल्यात माहीर असणारा हा खेळाडू विरोधी संघासाठी नेहमीच डोकेदुखी ठरतो. प्रो कबड्डीमध्ये खेळताना अनुप कुमारने ५७ सामन्यात ४११ गुण मिळवले असून त्यातील ३७७ गुण रेडींग मध्ये तर ३४ गुण डिफेन्समध्ये मिळवले असून फक्त रेडींगचा विचार केला तर स्पर्धेतील ३रा सर्वोत्तम रेडर.

#३ प्रदीप नरवाल:
‘डुबकी किंग’ किंग म्हणून ओळख असलेला पाटणाचा हा खेळाडू. याच खेळाडूने मागील दोन्ही मोसमात पाटणा पायरेट्सला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. प्रो कबड्डी चौथ्या मोसमात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या प्रदीप नरवाल याच्या नावावर ३८ सामन्यात २६३ गुण असून त्यातील २५६ गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले आहेत तर ७ गुण डिफेंसमध्ये मिळवले आहेत.

#४ काशीलिंग आडके:
महाराष्ट्राच्या मातीतील खेळाडू जो आपल्या फ्रॉग जंप, टो टच, बोनस, रनींग हॅन्ड टच या रेडींगच्या सर्व कौशल्यात माहीर आहे. प्रो कबड्डी इतिहासात दुसरा सर्वोत्तम रेडर ज्याने ५२ सामन्यात ४०६ गुण मिळवले असून त्यातील ३८० गुण रिडींगमध्ये तर २६ गुण डिफेन्समध्ये मिळवले आहे. एका सामन्यात सर्वाधिक २४ गुण मिळवण्याचा विक्रमही काशीच्याच नावे आहे.

#५ रोहित कुमार:
भारतीय कबड्डीचे भविष्य म्हणून ज्याला ओळखले जात आहे असा रोहित आपल्या शांत खेळाने विरोधी संघात खळबळ माजवायला खूप निपुण आहे. रोहितचा खेळ इतका जबरदस्त असतो की सामन्यात कोणत्या क्षणाला कसा खेळ करायचा आणि विरोधी संघाला बॅकफूटवर कसे टाकायचे याचे गणित त्याला चांगले जमते. बोनस, टो टच, रनींग हॅन्ड टच आणि विरोधी पकडीतून निसटून जाण्यात निपुण असणाऱ्या या खेळाडूने प्रो कबड्ड मध्ये खेळताना २६ सामन्यात २०९ गुण मिळवले असून त्यातील १९५ गुण त्याने रेडींगमध्ये तर १४ गुण डिफेन्समध्ये मिळवले आहेत. प्रो कबड्डी तिसऱ्या मोसमातील सर्वोत्तम खेळाडू असणारा रोहित प्रो कबड्डीमधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे.