सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरल्याने ट्विटरकरांनी उडवली रोहित शर्माची खिल्ली

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज चौथा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र या संधीचा फायदा उचलता न आल्याने सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यामुळे ट्विटरकरांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

या सामन्यात रोहितला ५ धावांवर असताना कागिसो रबाडाने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. रोहितसाठी दक्षिण आफ्रिका दौरा अपयशी ठरला आहे. त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यातही संधी देण्यात आली होती, पण त्यावेळी त्याला खास काही करता आले नव्हते त्याने कसोटी मालिकेत ४ डावात मिळून ७८ धावा केल्या होत्या.

तसेच पहिल्या चार वनडे सामन्यातही त्याने अनुक्रमे २०, १५,०,५ अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहते त्याच्यावर नाराज आहेत. आज रोहित बाद झाल्यावर हि नाराजी चाहत्यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. काहींनी मजेदार ट्विट करत रोहितला टोमणे मारले आहेत.

एकाने ट्विटमध्ये म्हटले आहे की “रोहितचे आज फक्त १९५ धावांनी द्विशतक हुकले आहे.” तर एकाने म्हटले आहे, ” रोहितने त्याच्या जर्सी क्रमांकापेक्षाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ४ वनडेत कमी धावा केल्या आहेत.”