१९८३ विश्वचषकावर आधारित चित्रपट होणार या दिवशी प्रदर्शित

भारताने जिंकलेला पहिला विश्वचषक म्हणजेच १९८३ चा विश्वचषकावर आधारित चित्रपट दिग्दर्शक कबीर खान घेऊन येत आहेत. त्या चित्रपटाचे नाव ” ‘८३” असून यात कपिल देव यांच्या प्रमुख भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली असून पुढील वर्षी ३० ऑगस्ट २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंगची भूमिका असणारा आणि कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख रविवारी चित्रपटाच्या ट्विटर अकाउंटवर जाहीर करण्यात आली.

१९८३ च्या विश्वचषकावर आधारित असा चित्रपट येणार आहे याची घोषणा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती.

कबीर खान यांनी आधीच चित्रपटाविषयी सांगितले होते की, “शाळकरी मुलगा असताना मी १९८३ चा विश्वचषक बघितला होता. त्यावेळी मी कल्पनाही केली नव्हती की या विश्वचषकानंतर क्रिकेट कायमचे बदलेल.”

ते पुढे म्हणाले होते, “एक चित्रपटनिर्माता म्हणून माझ्यासाठी या भारतीय संघाचा विजयापर्यंतचा प्रवास पूर्णपणे ऊर्जेने आणि जिद्दीने भरलेला होता. या प्रवासाची कथा ही मी काम केलेली सर्वात रोमांचक कथांपैकी एक आहे. रणवीर कपिल देवची भूमिका करण्यासाठी अगदी बरोबर आहे, त्यामुळे मी या भूमिकेत खरोखरच इतर कोणाला पाहू शकणार नाही.”

या चित्रपटात भारताचा विश्वचषक १९८३ मधील प्रवास दाखवण्यात येणार आहे. तसेच भारताने अंतिम सामन्यात बलाढ्य विंडीज संघाला कश्याप्रकारे मात दिली आणि आपला पहिला वाहिला विश्वचषक जिंकला या अविस्मरणीय प्रवासात हा चित्रपट आपल्या सर्वाना नेणार आहे.

या विश्वचषकात कपिल देव यांची झिम्बाब्वे विरुद्धची नाबाद १७५ धावांची खेळी आणि त्यांनी अंतिम सामन्यात घेतलेला विव रिचर्ड्स यांचा झेल प्रसिद्ध झाला होता. कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये विक्रमी ४३४ बळी घेतले आहेत.

याआधीही चित्रपटसृष्टीत खेळाडूंच्या जीवनावर अनेक चित्रपट झाले आहेत आणि ते हिटही झालेत. यात माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, कॅप्टनकूल एमएस धोनी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूंच्या जीवनावर चित्रपट बनले आहेत. तसेच क्रिकेट व्यतिरिक्त मेरी कॉम, मिल्खासिंग, फोगट भगिनी यांच्यावर देखील चित्रपट आले आहेत. तर भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालवरील चित्रपटाचेही काम चालू आहे.