हे १० संघ खेळणार २०१९ चा विश्वचषक

झिम्बाब्वेमध्ये २०१९ च्या विश्वचषकासाठी पात्रता फेरी चालू आहे. या पात्रता फेरीतून अफगाणिस्थान आणि विंडीज हे दोन संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

यामुळे २०१९ च्या विश्वचषकात खेळणारे १० संघ निश्चित झाले आहेत. आज अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात पात्रता फेरीतील सुपर सिक्सचा सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने ५ विकेट्सने विजय मिळवून विश्वचषकातील आपला सहभाग निश्चित केला.

अफगाणिस्तानच्या विजयात मोहम्मद शहजादचे अर्धशतक आणि अखेरच्या षटकात कर्णधार असगर स्टेनिकझाईने केलेली फटकेबाजी महत्वाची ठरली. त्याचबरोबर गुलाबादीं नाईबने शहजादला दिलेली साथही मोलाची होती.

त्याआधी आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २०९ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून पॉल स्ट्रीलिंगने अर्धशतक करून चांगली लढत दिली. पण त्याला बाकी फलंदाजांनी हवी तशी साथ दिली नाही. तसेच अफगाणिस्तानचा तरुण गोलंदाज रशीद खानने ४० धावात ३ विकेट्स घेऊन आयर्लंडच्या फलंदाजीला रोखले.

हा विजय अफगाणिस्थानला विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक होता. अफगाणिस्तान यामुळे दुसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. याआधी ते २०१५ मध्येही पात्र ठरले होते.

अफगाणिस्थानच्या या विजयामुळे मात्र झिम्बाब्वेचे २०१९ चा विश्वचषक खेळण्याचे स्वप्न अपुरे राहिले. झिम्बाब्वेसाठी हा सामना बरोबरीचा किंवा अफगाणिस्थानचा पराभव गरजेचा होता.

आता रविवारी अफगाणिस्तान विरुद्ध विंडीज असा पात्रता फेरीचा अंतिम सामना पार पडेल. हे दोन संघ आज पात्रता फेरीतून विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत तर आयसीसीच्या क्रमवारीतील पहिले आठ संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. २०१९ चा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे.

हे १० संघ खेळणार २०१९ चा विश्वचषक

इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
भारत
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
श्रीलंका
न्यूझीलंड
बांग्लादेश
विंडीज
अफगाणिस्तान