Top 5: आयपीएलमध्ये या ५ खेळाडूंना मिळाली त्यांच्या योग्यतेपेक्षा जास्त रक्कम

आयपीएलचा नवीन मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ २ महिने राहिले आहेत. या आयपीएल मोसमाचा लिलावही मागील महिन्यात पार पडला. त्यामुळे आता क्रिकेट जगतात याविषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत.

२७ आणि २८ जानेवारीला जो आयपीएल लिलाव झाला. या लिलावात अनेक आश्चर्यकारक निर्णय सर्वांसमोर आले. अनेक खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची बोली लागली तर अनेक असे खेळाडू होते ज्यांची योग्यता असतानाही त्यांच्यावर बोलीच लागली नाही. अशाच आश्चर्यकारक निर्णयांमुळे कदाचित आयपीएलमध्ये नशिबाचा भागही असतो असेच लक्षात आलेले आहे.

यावर्षीही असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या कामगिरीपेक्षा त्यांना लिलावात प्रचंड पैसा मिळाला आहे. यात मग केदार जाधव, के एल राहुल, संजू सॅमसन अशा खेळाडूंचा समावेश आहे.

या ५ खेळाडूंना मिळाली त्यांच्या योग्यतेपेक्षा जास्त रक्कम:

# ५ के एल राहुल: यावर्षीच्या आयपीएल लिलावात के एल राहुल तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने ११ कोटींची बोली लावून संघात घेतले आहे.

राहुल मागील काही मोसम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळाला आहे. परंतु त्याची आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खेळताना खास अशी कामगिरी झालेली नाही. त्याने २०१३ मध्ये आयपीएल खेळण्यास सुरुवात केली. पण त्याला ३९ सामन्यात खेळताना ३०.२१ च्या सरासरीने खेळताना फक्त ७२५ धावा करता आल्या आहेत.

तसेच सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही अजून राहुलला चांगला फॉर्म सापडलेला नाही. मात्र राहुलसाठी जमेची बाजू म्हणजे तो यष्टिरक्षणही करतो. त्याचमुळे पंजाब संघाने त्याला संघात घेतले असण्याची शक्यता आहे.

# ४ ग्लेन मॅक्सवेल: ‘द बिग शो’ असं ज्याला म्हटलं जात त्या ग्लेन मॅक्सवेलला त्याला दिलेल्या या नावाप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये फक्त ६ अर्धशतके केली आहेत. यातील ४ अर्धशतके तर २०१४ मध्ये त्याने केली होती. २०१४ च्या आयपीएल मोसमात मॅक्सवेलने पंजाब संघाला अंतिम फेरी गाठून दिली होती. मात्र त्यानंतर झालेल्या मोसमांमध्ये मॅक्सवेलला खास काही करता आलेले नाही गेल्या ३ मोसमात त्याने फक्त २ अर्धशतके केली आहेत.

अशी कामगिरी असतानाही दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने त्याला ९ कोटींना खरेदी केले आहे. मात्र दिल्ली संघासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे मॅक्सवेल चांगल्या फॉर्ममध्ये नुकताच परतला आहे. त्याने कालच इंग्लंडविरुद्ध टी २० मध्ये शतकी खेळी केली आहे. तसेच ३ विकेट्सही घेतल्या आहेत.

# ३ कृणाल पंड्या: मुंबई इंडियन्स संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमावलेल्या कृणाल पांड्याला या लिलावातही मुंबई इंडियन्सनेच राईट टू मॅच कार्ड वापरून ८.८० कोटी देऊन संघात कायम केले आहे. मुंबईने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मात्र सातच कोटी देऊन संघात ठेवले होते, पण कृणालला ८ कोटींपेक्षाही जास्त किंमत मिळाली आहे. याचेच सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

त्याला लागलेली ही बोली त्याच्या कामगिरीपेक्षाही त्याच्या ग्लॅमरकडे बघून मिळाली असल्याचे अनेकांची मते आहेत. त्याने या वर्षी देशांतर्गत क्रिकेट खेळताना सुमार कामगिरी केलेली आहे. त्याला नुकत्याच पार पडलेल्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला कोणत्या कामगिरीच्या जोरावर मुंबईने ८ कोटी रुपये मोजले आहेत असा प्रश्न पडला आहे?

# २ संजू सॅमसन: कोट्यवधी रुपये मिळालेल्या खेळाडूंमध्ये संजू सॅमसन हा देखील आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने ८ कोटी रुपये देऊन संघात घेतले आहे. संजू याआधी दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडूनही खेळला आहे. या संघाकडून खेळताना त्याची कामगिरी त्यामानाने चांगली झाली आहे. मात्र ८ कोटी खर्च करण्याइतपत त्याची कामगिरी विशेष अशी झालेली नाही.

मात्र त्याचे यष्टिरक्षण त्याच्या पथ्यावर पडले. याचमुळे राजस्थान संघाने त्याला संघात घेतले. मात्र मागील काही सामन्यांमध्ये त्याला त्याच्या फॉर्मशी झगडावे लागले होते. पण त्याने सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीमध्ये सलग २ अर्धशतके करून आपण चांगल्या फॉर्ममध्ये परतलो असल्याची पावती दिली आहे.

सॅमसनने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ६६ सामन्यात खेळताना ७ अर्धशतकाच्या मदतीने १४२६ धावा केल्या आहेत.

#१ केदार जाधव: भारताचा खालच्या फळीत खेळणारा फलंदाज आणि वेगळ्याच प्रकारची गोलंदाजीची शैली असणारा केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्सने ७.८० कोटी देऊन खरेदी केले आहे. पण चेन्नई संघात एमएस धोनी सारखा यष्टीरक्षक असताना तसेच ड्वेन ब्रावो, हरभजन सिंग आणि शेन वॉट्सन असे अष्टपैलू खेळाडू असताना केदारसाठी चेन्नईने इतके पैसे का खर्च केले याचेच सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

याबरोबरच केदारची आत्तापर्यंतची आयपीएलमधील कामगिरीही विशेष अशी झालेली नाही. त्याची एकही अशी खेळी लक्षात येत नाही की ज्यामुळे त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याला २०१७ चा मोसम सोडला तर एकदाही आयपीएलमध्ये २०० पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत. तसेच त्याने यष्टिरक्षण केले असल्याने आजपर्यंत आयपीएलमध्ये गोलंदाजी केलेली नाही.