तिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद

पुणे। दुर्वा जनार्दन हिने १८ ते २० किलो वजनी गटात तर, गौरी मांडवेकर हिने ४४ ते ४८ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी बजावताना कै. राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी येथे होरांगी तायक्वांदो अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या ‘खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप’ स्पर्धेतील अनुक्रमे १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले.

फाईटस प्रकारात १४ वर्षांखालील मुलींच्या १८ ते २० वजनी गटात दूर्वा जनार्दनने के. अवंतिकाला १७-१५ असे पराभूत करताना विजेतेपदकाला गवसणी घातली. तर १७ वर्षांखालील गटाच्या ४४ ते ४८ किलो वजनी गटात गौरी मांडवेकर हिने ज्योती अंडील हिला १९-१ अशा गुणांच्या फरकाने पराभूत करताना या गटाचे विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील गटाच्या २४ ते २६ किलोवजनी गटात मयुरी गावडे हिने अद्या सानप हिला १२-८ अशा गुण फरकाने पराभूत करताना स्पर्धेतील विजेतेपदाला गवसणी घातली.

१४ वर्षाखालील २४ ते २६ या वयोगटाच्या अंतिम लढतीमध्ये वंशिका महाजन हिने श्रेय तरल हिला ११-४ असे पराभूत करताना सुवर्णपदकाची कमाई केली. तर २४ ते २६ किलो वजनी गटात पावनी खोले हिने प्रियांका आठवले हिला ९ -४ अशा फरकाने पराभूत करताना स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. ४२ ते ४५ वजनीगटात एम.अनिशाने एस.अंड्रीला १५-१८ या गुण फरकाने पराभूत करत यश मिळवले.

स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चमकदार कामगिरी करत स्पर्धेचे सांघिक विजेतेपद पटकावले. कर्नाटक द्वितीय तर गुजरात संघाने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दक्षिण कोरियन स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष चुई होंग गी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दक्षिण कोरिया स्पोर्ट्स विभागाच्या राज्यपाल चो योंग सुन, कोरियन तायक्वांदो मास्टर विजय पार्क, लिम सून यी, भारतीय जनता पक्षाच्या वडगाव शेरी मतदार संघाचे सरचिटणीस महेंद्र भंडारी, आयोजक बाळकृष्ण भंडारी, महेंद्र कांबळे, राजू शिंदे, उमेश कुलकर्णी, चंद्रकांत भोसले, मदनमोहन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.