या पाच खेळाडूंपैकी एकाला मिळू शकते शिखर धवन ऐवजी टीम इंडियात संधी

भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि सलामीवीर शिखर धवन 2019 विश्वचषकातून 3 आठवड्यांसाठी बाहेर पडला आहे. शिखरला रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात डाव्या अंगठ्याची दुखापत झाली होती.

भारतीय संघ पुढील 3 आठवड्यात 6 सामने खेळणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने भारतासाठी हे सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे शिखर धवन ऐवजी भारतीय संघ दुसऱ्या खेळाडूला संधी देणार की पुढील 3 महिने 14 खेळाडूंसहच खेळणार हे पहावे लागणार आहे.

पण जर भारतीय संघाने शिखर ऐवजी बदली खेळाडू घेण्याचा विचार केला तर भारताकडे अंबाती रायूडू, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे असे अनेक पर्याय आहेत. तसेच शिखर 3 आठवड्यांसाठी बाहेर पडला असल्याने केएल राहुल रोहित शर्मासह सलामीला फलंदाजी करेल हे जवळ जवळ निश्चित आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजीला येणार हे देखील पहावे लागणार आहे.

शिखर धवन ऐवजी या खेळाडूंना मिळू शकते भारतीय संघात संधी – 

अंबाती रायडू – 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर अंबाती रायडूचे नाव बरेच चर्चेत होते. अनेकांनी तो संघात असायला हवा होता असे मत मांडले होते. तसेच नंतर काही वृत्ताप्रमाणे तो या विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्येही असल्याचे बोलले गेल.

त्याचबरोबर अंबाती रायडू मागील काही सामन्यात भारताकडून मधल्या फळीत खेळला आहे. त्यामुळे त्याला शिखरच्या ऐवजी भारतीय संघात बोलावले जाऊ शकते.

रिषभ पंत: 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होण्याआधी सुरुवातीला रिषभ पंतचेही नाव आघाडीवर होते. परंतू त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला या विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी देण्यात आली.

पण रायडू प्रमाणेच पंतचेही नाव या विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये असल्याची चर्चा होती. तसेच त्याने मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे. त्याने मागीलवर्षी इंग्लंड दौऱ्यात कसोटीमध्ये शतकी खेळीही केली होती. त्यामुळे त्यालाही संधी मिळू शकते.

अजिंक्य रहाणे: शिखर हा सलामीवीर फलंदाज असल्याने त्याच्याजागेवर राहुल फलंदाजीला उतरण्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले असल्याने भारतीय संघ रहाणेचा पर्यायी सलामीवीर म्हणून विचार करु शकतात.

त्याचबरोबर सध्या रहाणे काउंटी क्रिकेट खेळत असल्याने इंग्लंडमध्येच आहे. त्याने नुकतेच काउंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायरकडून पदार्पण करताना शतकी खेळीही केली होती. त्यामुळे भारतीय संघ त्याचाही विचार करु शकतात.

पृथ्वी शॉ: भारताकडून पृथ्वी शॉने अजून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. परंतू त्याची आकडेवारी कसोटी क्रिकेटमध्ये तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली आहे. त्याने मागीलवर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली होती. त्याचबरोबर तोही सलामीवीर फलंदाज असल्याने त्याचाही विचार केला जाऊ शकतो.

श्रेयस अय्यर: यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना या संघाला बाद फेरीपर्यंत पोहचवण्यात श्रेयस अय्यरने महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याचबरोबर तो मधल्या फळीतील फलंदाज असून जर राहुलने सलामीला फलंदाजी केली तर श्रेयसचा चौथ्या क्रमांकासाठी विचार होऊ शकतो.

त्याचबरोबर भारत अ संघाचा कर्णधार असलेल्या श्रेयसने भारताकडून याआधी मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. त्याने भारताकडून 6 वनडे सामन्यात खेळताना 2 अर्धशतकेही केली आहेत. त्याचबरोबर श्रेयस सध्या इंग्लंडमध्येच आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: भारत-न्यूझीलंड सामना होऊ शकतो रद्द, जाणून घ्या कारण

…तर युवराजला खेळता आला असता निवृत्तीचा सामना

टीम इंडियाला मोठा धक्का, शिखर धवन विश्वचषकातून बाहेर