युवराज पाठोपाठ हे पाच खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती

आज भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे.

त्याने त्याच्या या 19 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 304 वनडे, 40 कसोटी आणि 58 टी20 असे मिळून एकूण 402 सामने खेळले. यामध्ये मिळून त्याने 11778 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 2007 च्या टी20 आणि 2011 च्या वनडे विश्वचषक विजयात भारताकडून मोलाची कामगिरी केली आहे.

त्याचा 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातून सुरु झालेला हा प्रवास आता १९ वर्षांनंतर आज थांबत आहे.

त्याच्याबरोबर भारताचे आणखीही काही क्रिकेटपटू आहेत, जे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत किंवा लवकरच निवृत्ती घेऊ शकतात.

त्यातील ही काही निवडक नावे – 

एमएस धोनी – 

धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात बांगलादेश विरुद्ध 23 डिसेंबर 2004 ला वनडे सामन्यातून केली. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तसेच भारताला तीन आयसीसी ट्रॉफी मिळवून देणारा एकमेव कर्णधारही आहे.

पण 500 पेक्षा अधिक अंतरराष्ट्रीय सामने खेळलेला धोनी आता लवकरच निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. सध्या तो 2019 विश्वचषकात खेळत आहे. हा त्याचा कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक आहे. तसेच त्याने याआधीच डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

वासिम जाफर – 

वासिम जाफर हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावाजलेला क्रिकेटपटूही लवकरच निवृत्ती घेऊ शकतो. त्याने भारताकडून 31 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. 41 वर्षीय जाफर जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कारकिर्द घडवू शकला नसला तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहमीच उच्चप्रतीची कामगिरी केली.

त्याने खेळलेल्या 253 प्रथम श्रेणी सामन्यात 51.19 च्या सरासरीने तब्बल 19147 धावा केल्या आहेत. यात त्याने 57 शतके आणि 88 अर्धशतके केली आहेत. तो देशांतर्गत स्पर्धेत पूर्वी मुंबईकडून खेळला असून सध्या विदर्भकडून खेळतो.

इरफान पठाण – 

भारताच्या अष्टपैलू क्रिकेटपटूंमधील महत्त्वाचे नाव म्हणजे इरफान पठाण. डिसेंबर 2006 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या इरफाननेही अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही.

तो देशांतर्गत स्पर्धेत सध्या जम्मू-काश्मिर संघाकडून खेळतो. पूर्वी तो बडोदा संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायचा. तसेच तो नजीकच्या काळात समालोचन करतानाही दिसून आला आहे. त्यामुळे तोही लवकरच निवृत्ती जाहिर करु शकतो.

हरभजन सिंग – 

एकेकाळचा भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या फळीतील महत्त्वाचा गोलंदाज म्हणजे हरभजन सिंग. तोही आजकाल मोठ्या स्तरावर किंवा देशांतर्गत स्तरावर क्रिकेट खेळताना दिसत नाही. हरभजनला मार्च 2016 नंतर एकदाही भारतीय संघात संधी मिळालेली नाही. तसेच तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही 2017 नंतर जास्त सहभागी झालेला नाही.

त्याने मागील दोन वर्षात आयपीएल ही एकमेव मोठी स्पर्धा खेळली आहे. तसेच इरफान प्रमाणे तोही नजीकच्या काळात समालोचन करताना दिसला आहे. त्यामुळे कदाचित तोही लवकरच निवृत्ती घेण्याचा विचार करु शकतो.

अंबाती रायडू – 

2019 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर या संघात संधी न मिळाल्याने जवळजवळ सर्वाधिक चर्चेत राहिलेला खेळाडू अंबाती रायडूही क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करु शकतो.

त्याने याआधीच मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. पण त्याला 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळाली नाही. तसेच 34 वर्षीय रायडूची मागील काही सामन्यातील कामगिरीही खास झालेली नाही.

त्याचबरोबर हे क्रिकेटपटूही घेऊ शकतात क्रिकेटमधून लवकरच निवृत्ती – 

दिनेश कार्तिक, अमित मिश्रा, युसुफ पठाण, श्रीशांत, नमन ओझा, विनय कुमार, स्टुअर्ट बिन्नी.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…आणि युवराजचे ते स्वप्न अधूरेच राहिले!

निवृत्तीपेक्षाही मोठी बातमी, युवराज सिंगने घेतला मोठा निर्णय

-युवराजबरोबर पदार्पण केलेले ४ खेळाडू आजही खेळतात क्रिकेट