अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली पदार्पण केलेला तो खेळाडू आजही खेळतोय भारतीय संघातून

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या टी २० मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराने उत्तम फिटनेसनच्या जोरावर संघात पुनरागमन केलं आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी युवांसाठी ओळखल्या जाणाऱ्या टी २० क्रिकेटच्या प्रकारासाठी संघात निवड झाल्याने सर्वांनीच कौतुकाबरोबरच आश्चर्यही व्यक्त केले आहे.

मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली आशिष नेहराने भारतीय संघात २४ फेब्रुवारी १९९९ ला श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. या कसोटी सामन्यात नेहराला १ बळी मिळाला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता.अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला हा एकमेव खेळाडू सध्या भारतीय संघात खेळत आहे. हरभजन सिंगचे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली झाले आहे परंतु तो सध्या संघाचा भाग नाही.

पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नेहरा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १९ वर्ष पूर्ण करणार आहे. एका वेगवान गोलंदाजासाठी ही एक मोठी कामगिरी आहे. १२ शस्रक्रिया झाल्यानंतरही संघात निवड होणे ही नक्कीच कौतुकाची तसेच अभिमानाची गोष्ट आहे.

अझरुद्दीननंतर आलेल्या जवळ जवळ सर्वच कर्णधारांच्या नेतृत्वाखाली नेहरा खेळला आहे. अझरुद्दीन नंतर कसोटी संघाचे ७ कर्णधार झाले तसेच वनडेचे ११ तर टी २० चे ५ कर्णधारांनी भारतीय संघाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळेच नेहरा असा खेळाडू आहे जो अझरुद्दीन ते विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली खेळाला आहे.

उत्तम फिटनेस आणि रोज योग्य सराव असेल तर खेळात उत्तम कामगिरी करता येते याचे एक उत्तम उदाहरण आशिष नेहराने सर्वांपुढे ठेवले आहे. आजही तो पाहिल्यासारखाच वेगाने गोलंदाजी करतो. आत्ताही नेहरा जवळजवळ १४० च्या वेगाने गोलंदाजी करतो.

आत्तापर्यंत नेहराने १७ कसोटी, १२० वनडे आणि २६ टी २० सामने खेळले आहेत. या सर्व प्रकारात मिळून त्याने एकूण २३५ बळी घेतले आहेत.